लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
लंडन : टँकरचालकांची कमतरता निर्माण झाल्याने इंधन पुरवठा विस्कळित झाला. त्याच
वेळी अचानकपणे मागणीतही वाढ झाल्याने देशात इंधनटंचाई निर्माण झाली. इंधन
तुटवड्यावर उपाय म्हणून ब्रिटनमध्ये सोमवारपासून इंधन वितरण लष्करामार्फत करण्यात
येणार आहे. ब्रिटीश लष्कराचे दोनशे सैनिक इंधन पुरवठा सुरळीत करण्यासाठी कार्यरत
झाले आहेत. या सैनिकांना इंधन पुरवठा करणारे टँकर चालविण्यासाठीचे आवश्यक ते
प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे सध्या ब्रिटनमध्ये असणाऱ्या परदेशी
टँकरचालकांच्या व्हिसाच्या मुदतीतही वाढ करण्यात आली आहे. अभूतपूर्व इंधन
टंचाईमुळे ब्रिटनमध्ये मोठे संकट निर्माण झाले आहे. अनेक पेट्रोलपंप बंद असून
जीवनावश्यक वस्तूंचा होणारा पुरवठाही विस्कळीत झाला आहे.
टँकरचालकांची कमतरता का?
करोनामुळे बहुसंख्य टँकरचालकांनी निवृत्ती
घेतली. तर, अनेक परदेशी चालक
मायदेशी परतले. लॉकडाउनमुळे चालकांचे प्रशिक्षण आणि परीक्षा घेण्यातही मोठ्या
अडचणी निर्माण झाल्या. परिणामी संपूर्ण ब्रिटनमध्ये ट्रकचालकांचा तुटवडा निर्माण
झाला. काही महिन्यांआधी ब्रिटनने युरोपीय महासंघातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.
महासंघातील सदस्य देशांतील ट्रकचालक एकमेकांच्या देशात जाऊ शकत होते. मात्र, ब्रिटन महासंघाबाहेर बाहेर पडल्याने ही मुभा
संपुष्टात आली; तसेच काही हजारो चालकांना ब्रिटनमधून
त्यांच्या मायदेशी जावे लागले. त्याच्या परिणामी आधीच कर्मचारी टंचाई भेडसावणाऱ्या
ब्रिटनची अधिक कोंडी झाली.
विस्कळित इंधन पुरवठा सुरळीत करण्याच्या दृष्टीने परदेशी चालकांच्या व्हिसाला मुदतवाढ देण्यात येणार आहे. सुमारे पाच हजार परदेशी ट्रकचालकांना या व्हिसा मुदतवाढीचा फायदा मिळणार आहे. यातील ३०० चालक परदेशांतून ब्रिटनमध्ये येऊ शकणार आहेत आणि ते मार्चअखेरपर्यंत राहू शकतील. सुमारे ४७०० जणांना अन्नपदार्थांची वाहतूक करणारे ट्रकचालक ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत येऊ शकतील आणि फेब्रुवारीअखेरपर्यंत राहू शकतील.
0 टिप्पण्या