लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
अहमदनगर : ‘सध्या राज्यातील राजकारण अस्थिर आहे. कोण
कोणाला पळवतय, कोण कोणाबरोबर जातय, हे
काहीच कळायला मार्ग नाही, आपल्याला मात्र भाजप सोडून
दुसरीकडे जाण्याची गरज नाही. विषय फक्त कोणाला सोबत घ्यायचा हा आहे. ज्या माणसांनी,
ज्या पक्षांनी सिंचन क्षेत्रात घोटाळे करून राज्यातील शेतकऱ्यांवर
उपासमारीची वेळ आणली त्यांचे नेतृत्व मान्य करण्याइतका मी राजकारणात लाचार झालेलो
नाही. स्वंतत्र निघेन पंरतु दुसऱ्या कोणा चुकीच्या माणसाच्या पाया पडायचं पाप
करणार नाही. असे भाजपा खासदार डॉ.
सुजय विखे पाटील यानी जाहीर कार्यक्रमात सांगुन आजोबा बाळासाहेब
विखे पा. यांचा स्वाभिमानी बाणा जागविला. त्यामुळे जिल्हाभरात याच विधानाची जोरदार
चर्चा सुरु आहे.
निमित्त
होते, शेवगाव येथील एका रस्त्याच्या
कामाच्या भूमिपूजनाचे. बिनधास्त बोलण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या सुजय विखेंनी आपल्या
भाषणात चौफेर फटकेबाजी केली. डॉ. विखे यानी रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन केले. यावेळी
भाजपच्या आमदार मोनिका राजळे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा
राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजश्री घुले याही उपस्थित होत्या. यावेळी विखे यांनी जिल्हा
परिषदेच्या कारभारावर घुलेंसमोरच जोरदार टीका केली. त्यानंतर त्यांचा मोर्चा वळ्ला
तो राज्याच्या राजकारणाकडे.. सध्याच्या राजकीय अस्थिर परिस्थितीकडे आणि भविष्यातील
परिस्थितीत काय होईल, हे सांगता येत नसल्याकडे लक्ष वेधतानाच
अशा परिस्थितीत आपलीही भूमिका ठरवावी लागेल, ‘पंतप्रधान
नरेंद्र मोदी व विरोधी पक्षनेते देवेंद्र
फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आमच्या सारख्या तरुणांना काम करण्याची संधी मिळाली,
यातच आमचे भाग्य आहे. आम्हाला भाजप सोडून दुसरीकडे जाण्याची गरज
नाही. ज्या माणसांनी, ज्या पक्षांनी सिंचन क्षेत्रात घोटाळे
करून राज्यातील शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आणली त्यांचे नेतृत्व मान्य करण्याइतका
मी राजकारणात लाचार झालेलो नाही. दिवंगत मा.खा.बाळासाहेब विखे पाटील यांनी हेच
तत्व सांभाळले होते आणि आम्हालाही तीच शिकवण दिली आहे.' अशा शब्दांत त्यानी आजोबांच्या स्वाभिमानी आठवणीना उजाळा दिला.
विखे
पाटील यांच्या या वक्तव्याचे अनेक अर्थ काढले जात आहेत. त्यांच्या बोलण्याचा रोख
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडे असल्याचे मानले जात आहे. गेल्या आठवड्यात
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी नगरला आले होते. कार्यक्रमाचे संयोजन
खासदार या नात्याने सुजय विखे पाटील यांच्याकडे होते. या कार्यक्रमाला गडकरी
यांच्या सूचनेवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना निमंत्रित करण्यात आले होते.
कार्यक्रमात पवार आणि गडकरी यांनी एकमेकांचे कौतुक केले. मूळात या कार्यक्रमास
पवार यांना निमंत्रित करण्यावरूनच राजकीय चर्चा रंगली होती. पवारांना निमंत्रण आपण
नव्हे तर गडकरी यांनीच दिले होते, असे सुरुवातीपासून विखे पाटील सांगत होते. या कार्यक्रमाशीही आजच्या विखे
यांच्या वक्तव्याचा संदर्भ जोडला जात आहे.
0 टिप्पण्या