Ticker

6/Breaking/ticker-posts

अण्णांच्या दिमतीला आता (Ex-Servicemen) फौज.. आंदोलन तीव्र होणार

 


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

राळेगणसिद्धी: भ्रष्टाचार विरोधी आंदोलान व  गावोगावी सामाजिक कार्य करण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक  अण्णा हजारे यांच्या मदतीला माजी सैनिकांचे (Ex-Servicemen) संघटन उभारण्यात येत आहे. देशभरात नऊ लाख माजी सैनिक असून दरवर्षी त्यामध्ये सत्तर हजार नव्याने निवृत्त होणाऱ्यांची भर पडते. सैनिकी शिस्त अंगात रुजलेलेल्या या कार्यकर्त्यांचा आंदोलने आणि सामाजिक कार्यासाठी वापर करण्याचे नियोजन आहे. त्यानुसार अशा माजी सैनिकांचे पहिले प्रशिक्षण शिबीर राळेगणसिद्धीमध्ये सोमवारी घेण्यात आले.

काही दिवसांपूर्वी माजी सैनिकांचे एक शिष्टमंडळ हजारे यांना भेटायला आले होते. त्यांनी हजारे यांच्या चळवळीत काम करण्याची इच्छा वक्त केली. त्याला प्रतिसाद देत भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास आणि पारनेर तालुका माजी सैनिक मंच यांच्या संयुक्त विद्यमाने या एक दिवसाच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सुरवात पारनेर तालुक्यापासून करण्यात आली असून त्यानंतर विविध ठिकाणाहून अशीच संघटना बांधणी करण्यात येणार आहे. या शिबिरात माजी सैनिक गावात कोणते सामाजिक कार्य करू शकतात, त्यासाठी काय करावे लागते, काय अडचणी येतात, भ्रष्टाचार विरोधी चळवळ आणि आंदोलनांचे काम कसे चालते, त्यात माजी सैनिक कसे योगदान देऊ शकतात, यासंबंधी मार्गदर्शन करण्यात आले. माजी सैनिकांमधील शिस्त, देश निष्ठा, काम करण्याची चिकाटी या गुणांचा वापर चळवळीसाठी कसा करून घेता येईल, यासंबंधी यामध्ये चर्चा झाली. हजारे स्वत: माजी सैनिक असल्याने त्यांच्याप्रती माजी सैनिकांना विशेष आदर आहे. त्यामुळे हे संघटन देशपातळीवर उभारण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत.

या शिबिरात हजारे यांनीही माजी सैनिकांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, ‘माजी सैनिकांनी सैन्यात असताना देशासाठी योगदान दिले. तसे निवृत्तीनंतर समाजासाठी योगदान द्यावे. देशातील माजी सैनिकांनी ठरवले तर हा देश बदलायला वेळ लागणार नाही. मजबूत संघटनेशिवाय कोणतेही प्रश्न सुटणार नाहीत. मी समाजासाठी आजपर्यंत जे काही थोडेफार करू शकलो, ते संघटनेमुळेच. असे संघटन केवळ संख्यात्मक नको तर गुणात्मक असायला हवे. चारित्र्यशील लोकांचे संघटन झाले तर सरकारचे नाक दाबल्यास तोंड उघडायला वेळ लागणार नाही. राजकारणातून गावचा विकास होऊ शकत नाही. त्यासाठी समाजिक व राष्ट्रीय दृष्टिकोन असलेले नेतृत्व पुढे आले पाहिजे. ते नेतृत्व निष्कलंक असायला हवे. तसेच समाजासाठी जगण्याची आणि समाजासाठीच मरण्याची तयारी अशा नेतृत्वाने ठेवायला हवी. हे काम एक माजी सैनिक नक्कीच करू शकतो. आपल्या देशात दरवर्षी ७० ते ८० हजार सैनिक निवृत्त होतात. एकट्या महाराष्ट्रातून दरवर्षी सात हजार सैनिक निवृत्त होतात. या सैनिकांनी ठरवले तर हा देश बदलायला वेळ लागणार नाही. प्रत्येक सैनिकाने निवृत्तीनंतर आपल्या गावासाठी योगदान दिले तर गावेही बदलायला वेळ लागणार नाही,’ असा विश्वास हजारे यांनी व्यक्त केला.

आलेल्या सैनिकांनी आपापल्या गावासाठी योगदान देण्याचा आणि हजारे यांच्या भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनात सहभागी हेण्याचा निर्णय घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाळासाहेब नरसाळे यांनी केले. प्रकाश ठोकळ, महादेव लामखडे, राहूल गाडगे यांनीही मनोगत व्यक्त केले. तर मारुती पोटघन, राज्य सैनिक संघटनेचे नारायण अंकुशे व कॅप्टन विठ्ठल वराळ यांनीही यावेळी सैनिकांना मार्गदर्शन केले. रावसाहेब चक्रे यांनी सूत्रसंचालन केले, तर साठे यांनी आभार मानले. शिबिर यशस्वी होण्यासाठी संदीप पठारे, श्यामकुमार पठाडे, अन्सार शेख, रामदास सातकर यांनी सहकार्य केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या