लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
मुंबई: मागील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक दिग्गजांनी सोडचिठ्ठी
दिल्यामुळं एकाकी पडलेल्या, तरीही अनपेक्षितरित्या 'कमबॅक' करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसनं आतापासूनच
सावध होत पुढील तयारी सुरू केली आहे. त्यामुळंच की काय, विद्यमान
आमदारांसोबतच मागील निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांची बैठक राष्ट्रवादीनं
बोलावली आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद
पवार स्वत: या बैठकीला मार्गदर्शन
करणार आहेत.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर
राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक आमदार, खासदार व वजनदार नेत्यांनी पक्ष सोडला होता. पुन्हा सत्ता येणार नाही हे
लक्षात आल्यामुळं या सर्व नेत्यांची भाजपच्या तंबूत आसरा घेतला होता.
जिल्ह्याजिल्ह्यातले तालेवार नेते ऐनवेळी सोडून गेल्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसला
व शरद पवारांनाही धक्का बसला होता. त्यामुळं निवडणुकीला सामोरं जाताना पक्षाची
अवस्था दयनीय झाली होती. अनेक ठिकाणी चांगले उमेदवार मिळवणं कठीण झालं होतं. अशा
परिस्थितीत शरद पवारांनी जिद्दीनं प्रचाराचा किल्ला लढवत वातावरण फिरवलं व पक्षाची
घसरण थांबवली. निकालानंतर 'किंगमेकर'ची
भूमिका बजावत शिवसेनेच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं व भाजपला
सत्तेबाहेर फेकलं. मागील वेळी ओढवलेली परिस्थिती भविष्यात ओढवू नये म्हणून
राष्ट्रवादी आतापासूनच कामाला लागली आहे. त्यासाठीच पक्षाच्या विजयी आणि पराभूत
उमेदवारांची बैठक बोलावण्यात आल्याचं बोललं जात आहे.
0 टिप्पण्या