Ticker

6/Breaking/ticker-posts

धक्कादायक ! शॉक लागून नगच्या गोळाफेकपटूचा मृत्यू

 






लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

अहमदनगर: घरात आलेल्या टीव्ही केबलमध्ये वीज प्रवाह उतरल्याने त्याचा धक्का बसून अजिंक्य सुरेश गायकवाड (वय २८) या खेळाडूचा मृत्यू झाला. टीव्ही व्यवस्थित दिसत नसल्याने अजिंक्य केबल काढून परत जोडण्याचा प्रयत्न करीत असताना त्याला विजेचा धक्का बसला आणि काही क्षणातच त्याचा मृत्यू झाला. या प्रकाराला संबंधित यंत्रणा जबाबदार असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती जागरूक नागरिक मंचाचे अध्यक्ष सुहासभाई मुळे यांनी दिली.

नगर शहरातील विनायकनगर परिसरात एक सप्टेंबरला ही घटना घडली. अंजिक्य गायकवाड टीव्ही पहता असताना व्यवस्थित दृश्य दिसत नव्हते. त्यामुळे केबल तपासण्यासाठी टीव्हीजवळ जाऊन त्याने केबलला हात लावला. त्यावेळी धक्का बसून त्याचा मृत्यू झाला. अजिंक्य खेळाडू असून त्याने गोळाफेकमध्ये अनेक पुरस्कार मिळविले आहेत. सुमारे दीड वर्षांपूर्वी त्याचा विवाह झाला होता. माजी नगरसेवक सुरेश गायकवाड यांचा तो मुलगा.


घटनेची माहिती मिळल्यानंतर पोलिस किंवा वीज कंपनीकडून कोणीही पाहणी करण्यासाठी आले नाही. गायकवाड हे जागरूक नागरिक मंचाचे सदस्य आहेत. मंचाचे अध्यक्ष मुळे स्वत: अभियंता आहेत. त्यांनी आणि मकंरद घोडके यांनी घटनास्थळाची पाहणी केली. तेव्हा धक्कादायक माहिती पुढे आल्याचे मुळे यांनी सांगितले. ज्या केबलचा धक्का बसला त्यामध्ये सुमारे चार हजार होल्टला वीज प्रवाह उतरलेला होता. ही केबल उच्चदाब वीज वाहिनीच्या खांबांवरून, तारांवरून टाकत घरात आणलेली होती. नगर शहरात बहुतांश ठिकाणी टीव्हीची केबल अशा पद्धतीने विना परवाना, बेकायदेशीरपणे आणि धोकादायक पद्धतीने विजेच्या खांबावरूनच टाकण्यात आलेली आहे. संपूर्ण शहरात असेच विजेच्या तारांमध्ये टीव्ही केबलचे जाळे झालेले पहायला मिळते. काही ठिकाणी महापालिकेच्या पथदिव्यांच्या खांबांचा आधार घेत ही केबल टाकलेली असते. यावर वीज वितरण कंपनी आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे लक्ष हवे. मात्र ते दुर्लक्ष करीत असल्याने केबलचालक अशा धोकादायक पद्धतीने केबल टाकतात, असा आरोप मुळे यांनी केला आहे.

अशा बेफिकीरपणामुळेच गायकवाड कुटुंबीयांवर दुर्दैवी प्रसंग ओढावला आहे. त्यामुळे जागरूक नागरिक मंचातर्फे संबंधिताविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांत फिर्याद देण्यात येणार आहे. येत्या आठ दिवसात संपूर्ण नगर शहरातील अशा विद्युत खांबावरून आणि उच्चदाब वीज तारांवरून घरोघर पोचवण्यात आलेल्या बेकायदेशीर आणि अतिधोकादायक टीव्ही केबलचे जाळे काढून टाकावे, अन्यथा त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार केल्याचे फौजदारी गुन्हे, सदोष मनुष्यवधाचे गुन्हे, कामात कुचराई केल्याचे गुन्हे जागरुक नागरिक मंचातर्फे दाखल करण्यात येणार आहेत, असा इशाराही मुळे यांनी दिला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या