लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
अहमदनगर : सद्द स्थितीत शेतकरी आपल्या प्रश्नांसाठी वर्षभरापासून
रस्त्यावर उतरला असून शेतकऱ्यांच्या विरोधातील काळे कायदेच रद्द करण्यासाठी
देशभरातील शेतकरी संघर्ष करीत आहे. संघर्षासाठी देशातील व राज्यातील काँग्रेस पक्ष
हा सातत्याने शेतकऱ्यांच्या पाठीशी राहील असा विश्वास राज्याचे महसूल मंत्री
नामदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.
अहमदनगर येथे
जिल्हा किसान काँग्रेसच्या जिल्ह्यातील पदग्रहण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते
बोलत होते. आ. लहु कानडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी जिल्हा
काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब साळुंके, प्रदेश काँग्रेसचे सचिव दीप चव्हाण, जिल्हा
कार्याध्यक्ष सचिन गुजर, जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारे,
शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे, इंद्रभान थोरात,
युवकचे जिल्हाध्यक्ष स्मितल वाबळे आदी उपस्थित होते.
अहमदनगर जिल्हा
काँग्रेस किसान काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष विक्रम नवले यांनी महसूल खात्याच्या
माध्यमातून ई पीक पाहणी व संगणकीकृत सातबारा हा महत्वकांक्षी कार्यक्रम
शेतकऱ्यांसाठी राबविण्याबाबत आघाडी सरकारचे अभिनंदन केले. तर हा कार्यक्रम
जिल्ह्यातील प्रत्येक गावापर्यंत घेऊन जाण्यासाठी जिल्हा किसान काँग्रेस काम करेल
असा संकल्प केला.
आमदार लहू
कानडे आपल्या भाषणात म्हणाले, देशातील शेतकरी सध्या अनेक प्रश्नांना तोंड देत असून देशातील शेती
उत्पन्नाचे भाव स्थिर रहावे यासाठी एम एस पी मिळावी व एम एस पी ला कायदेशीर आधार
प्राप्त व्हावा यासाठी देशातील शेतकरी आंदोलन करत आहे. या आंदोलनास काँग्रेस
पक्षाचा पूर्ण पाठिंबा असून त्या प्रश्नांची भूमिका गावपातळीवरील शेतकऱ्यांपर्यंत
पोहोचविण्यासाठी जिल्हा किसान काँग्रेसने काम करावे, अशी
भूमिका त्यांनी मांडली. यावेळी तालुका अध्यक्ष व जिल्हा पदाधिकारी म्हणून किसान
काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा नामदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते सन्मान करण्यात
आला.
0 टिप्पण्या