लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
राळेगणसिद्धी : ‘कोणत्याही पक्षाच्या हाती देशाचे उज्ज्वल
भवितव्य नाही. सगळे सत्ता आणि पैशांच्या मागे धावत आहेत. अशा परिस्थितीत जनसंसद
मजबूत झाली पाहिजे. या माध्यमातून लोक जागे झाले तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार देखील पाडले जाऊ शकते,’
असा थेट गर्भित इशारा ज्येष्ठ
समाजसेवक अण्णा हजारे यानी दिला आहे. अण्णानी लोकायुक्तच्या मुद्द्यावर राज्यातील ठाकरे सरकार
पाडण्याचा इशारा दिल्यानंतर आता देशपातळीवर आंदोलनाची धार अधिक तेज केली आहे. देशातील
१४ राज्यांतून आलेल्या कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण शिबीर राळेगणसिद्धीमध्ये झाले.
यावेळी बोलताना हजारे यांनी त्यांचेशी संवाद साधताना दीर्घकालीन नियोजन करून
कामाला लागण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्या.
गेल्या आठवड्यात अण्णा हजारे यांनी राज्यातील
लोकायुक्त कायदा सक्षम करण्यासाठी महाविकास आघाडीच्या सरकारला तीन महिन्यांची मुदत
दिली आहे. अन्यथा जानेवारीपासून आंदोलनचा इशारा देताना एक तर कायदा होईल, किंवा ठाकरे सरकार पडेल, असा निर्वाणीचा इशारा दिला. त्यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.
या
घडामोडी सुरू असतानाच राळेगणसिद्धीमध्ये राष्ट्रीय कार्यकर्ता शिबीर झाले. यामध्ये
हजारे यांनी देशव्यापी मुद्द्यांना हात घातला. जगदीश प्रसाद सोलंकी (दिल्ली), रामपाल जाट (राजस्थान), भोपलसिंग
चौधरी (उत्तराखंड), कल्पना इनामदार (मुंबई), योगेंद्र पारीख (राजस्थान), अशोक सब्बन (महाराष्ट्र),
दशरथभाई (राजस्थान) असे प्रमुख कार्यकर्ते यावेळी व्यासपीठावर
उपस्थित होते. सुमारे ८६ कार्यकर्त्यांनी या शिबारात सहभाग घेतला.
प्रशिक्षणादरम्यान हजारे यांचंही भाषण झालं.
यावेळी ते म्हणाले, ‘ब्रिटिशांच्या काळात बाहेरचे
लोक देशाला लुटत होते. आता आपल्याच लोकांचं सरकार असूनही लुटालूट सुरूच आहे. सर्वच
पक्षांचे लोक केवळ सत्ता आणि पैशात गुरफटून गेले आहेत. प्रत्येक सरकार
स्वातंत्र्याचा अर्थ जर स्वैराचार असा घेऊन वागत असेल तर जनसंसद एवढी बुलंद झाली
पाहिजे की सरकार पाडता आलं पाहिजे. सध्या तरी देशाला वाचवण्याचा तेवढाच पर्याय
दिसतो आहे. काँग्रेस असो अगर भाजप कोणत्याच पक्षाकडून देशाचं भवितव्य सुरक्षित
वाटत नाही. देशाला वाचवायचं असेल तर सरकार कोणत्याही पक्षाचे असो, त्यांच्यावर अंकुश असणारी जनसंसद ताकदवान करण्याची गरज आहे.
अरविंद
केजरीवालांवर अप्रत्यक्ष निशाणा
'सरकारवर दबाव आणू शकणारी अराजकीय
संघटना उभी राहिली पाहिजे. २०११ मध्ये लोकपालसाठी आंदोलन करताना आम्ही हीच
संकल्पना घेऊन पुढे आलो होतो. मात्र, त्यातील काही
लोकांमध्ये पुढे राजकीय महत्वाकांक्षा निर्माण झाली. कोणी मुख्यमंत्री झाले,
कोणी राज्यपाल झाले. यात चळवळीचं आणि देशाचंही नुकसान झालं.
त्यामुळे बिगर राजकीय, चारित्र्यवान कार्यकर्त्यांचं संघटन
उभं राहिलं पाहिजं. त्यासाठी घाई करून चालणार नाही. योग्य निवड करून चांगल्या
कार्यकर्त्यांची टीम तयार झाली पाहिजे. लोकशाही राज्यात संसदेपेक्षा जनसंसद मोठी
आहे. कार्यकर्त्यांनी ती मजबूत केली तर नरेंद्र मोदी यांचे सरकारही पाडले जाऊ शकते,’
असंही हजारे म्हणाले.
आपल्यावर होणाऱ्या टीकेबद्दल ते म्हणाले, ‘काही लोक माझ्यावर जाणीवपूर्वक टीका करतात.
मात्र, आपण त्याकडे लक्ष देत नाही. ते माझं कामही नाही. समाज
आणि देशासाठी आयुष्य देणे हे माझं काम आहे. सत्य कधीच पराभूत होत नाही, यावर माझा विश्वास आहे. मला कोणत्याही राजकीय पक्षाशी काहीही देणेघेणे
नाही. फक्त समाज आणि देशाच्या बाजूने आपण लढत राहू. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरही
आपण अनेक आंदोलने केली आहेत. सध्या सुरू असलेल्या आंदोलनालाही पाठिंबा दिलेला आहे,’
असंही हजारे यांनी सांगितलं.
दरम्यान, या शिबिरात राष्ट्रीय पातळीवरील संघटन पुन्हा मजबूत करण्याचा निर्णय झाला.
त्यासाठी कार्यकर्त्यांना जबाबदारीचं वाटपही करण्यात आलं आहे.
0 टिप्पण्या