Ticker

6/Breaking/ticker-posts

'या' तारखेपासून राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस..!

 


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

मुंबई : सप्टेंबर महिन्याच्या सुरवातीला मुसळधार पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकरी सुखावला. काही ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने शेतीचं नुकसान झाल्याचंही पाहायला मिळालं. अशात आता विकेंडनंतर पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.

गेल्या आठवड्यामध्ये मराठवाड्यात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतकरी मेटाकुटीला आला. त्यानंतर चार-पाच दिवसांपासून पावसाचा जोर कमी झालेला पाहायला मिळाला. पण आता विकेंडनंतर राज्यात पुन्हा एकदा विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आलेली आहे.

रविवारी देखील अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस असणार आहे. नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक अशा चारही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर इतर ठिकाणी विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी आणि मंगळवारी काही ठराविक ठिकाणी पावसाचा जोर वाढण्याची शक्‍यता आहे.

आज हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, १९ सप्टेंबर म्हणजे रविवारपासून पुढचे तीन दिवस हे राज्यात पावसाचे असणार आहेत. या दिवसांमध्ये उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पावसाचा अंदाज घेत शेतीची कामं करावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

परतीचा पाऊस लांबणीवर...

यंदा परतीचा पाऊस लांबणार असल्याचंही हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही दिलासादायक बातमी आहे. शेतकऱ्यांना खरिपातील पीक काढण्यासाठी पुरसा वेळ मिळणार आहे. त्यामुळे परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांना थोडाफार दिलासा मिळेल. परतीचा पाऊस ऐनवेळी दगा देत असल्याने दरवर्षी पीक पाण्यात वाहून जातात. पण यंदा लांबणीवर असलेल्या पावसामुळे पिकांची काढणी ही वेळेत करण्यात येणार आहे. खरंतर, यंदा राज्यात परतीच्या पावसाला उशिरा सुरुवात होणार असून महाराष्ट्रातही हा पाऊस उशिरा दाखल होण्याची शक्‍यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या