लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
औरंगाबाद : शहराला मंगळवारी सायंकाळी मुसळधार पावसाने अक्षरश:
झोडपले. सलग दीड ते दोन तास पडलेल्या पावसाने अनेक वसाहती जलमय झाल्या, हजारो घरांमध्ये पाणी शिरले. पडझडीच्या घटना देखील घडल्या. गेल्या तीन –
चार दिवसांपासून शहरात पावसाची रिपरिप सुरु आहे. मंगळवारी सकाळपासून
पाऊस सुरु होता. दुपारी पावसाने थोडी उघडीप दिली पण त्यानंतर सायंकाळी पुन्हा पाऊस
सुरु झाला. सायंकाळी सात वाजेच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. ढगफुटीसारखाच
पाऊस पडला. दीड ते दोन तास मुसळधार पाऊस कोसळत होता.
शहरातून वाहणाऱ्या नाल्यांना पूर आले, सखल भागात पाणी साचले. समर्थनगर,
औरंगपुरा, बुढीलेन, सिडको
– हडको परिसरातील अनेक सेक्टर्स, जयभवानीनगर,
गुलमंडी, मुकुंदवाडी, हर्सुल,
पडेगाव, सातारा परिसर, गारखेडा,
उल्कानगरी, आरेफ कॉलनी, जुनाबाजार,
कटकट गेट, शरीफ कॉलनी, किराडपुरा,
चंपाचौक, बायजीपुरा, सईदा
कॉलनी, मुजफ्फरनगर, कुंभारवाडा,
राजाबाजार, नारेगाव, मसनतपुर,
चिकलठाणा, हिनानगर, भीमनगर
- भावसिंगपुरा आदी भागातील वसाहतींमध्ये गुडघ्यापेक्षा जास्त उंचीचे पाणी साचले.
त्यामुळे हजारो घरांमध्ये पाणी शिरले. त्यातच वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे
नागरिकांना घरात शिरलेले पाणी बाहेर काढण्यास अडचणींचा सामना करावा लागला. बादल्या
भरुन भरुन नागरिकांनी घरातील पाणी बाहेर काढले.
जयभवानीनगरच्या नाल्याला मोठा पूर आला, त्यामुळे ह ानाला ओव्हरफ्लो
झाला. या भागातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले. सिडको एन ६ येथील नाल्याला देखील पूर
आला. त्यामुळे बजरंग चौक, आझाद चौकात परिस्थिती
नियंत्रणाबाहेर गेली होती. शहराच्या मध्यवस्तीतून वाहणाऱ्या औरंगपुऱ्याच्या
नाल्याला देखील पूर आला. औषधीभवनच्या नाल्यावरील पुलाचे काम सध्या सुरु आहे.परंतु
मुसळधार पावसामुळे या नाल्याला देखील पूर आला आणि औषधीभवनच्या इमारतीची भींत पडली.
नाल्यातून वाहणाऱ्या पाण्याचा प्रवाह इतका जोरात होता की त्यात काही वाहने वाहून
गेली.
शहरात ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्यामुळे
जनजीवन विस्कळीत झाले. दुपारपर्यंत रिमझिम पाऊस सुरू होता. मात्र, सायंकाळी सात वाजता मुसळधार पावसाला
सुरुवात झाली. रात्री आठपर्यंत पावसाचा जोर कायम होता. या पावसाने समर्थनगर,
औरंगपुरा, जयभवानीनगर, जवाहर
कॉलनी, श्रेयनगर परिसरातील मुख्य रस्ते पाण्याखाली गेले.
त्यामुळे वाहतूक काही वेळ ठप्प झाली.
यंदा पहिल्यांदा शहराने मुसळधार पावसाचा अनुभव
घेतला. चिकलठाणा वेधशाळेतील नोंदीनुसार दिवसभरात १२१ मिमी पाऊस झाला. तर साडेसात
ते साडेआठ या एका तासात ११६ मिमी पाऊस झाला. एमजीएम विद्यापीठातील स्वयंचलित
हवामान केंद्रात ८७.६ मिमी पावसाची नोंद झाली. सायंकाळी सात वाजून बारा मिनिटानंतर
पावसाने अतिशय रौद्र रूप धारण केले. एका तासाच्या कालावधीत ढगफूटीपेक्षा जास्त
वेगाने पाऊस झाला. सुरुवातीच्या तीस मिनिटांत पाऊस पडण्याचा सरासरी वेग १६६.७५
मिमी नोंदला गेला. या तीस मिनिटांत ५६.२ मिमी पावसाची नोंद झाली. शहराला
ढगफुटीपेक्षा वेगाने झोडपून काढले. त्यानंतर पावसाचा वेग कमी झाला. रात्री आठ
वाजून दहा मिनिटांपर्यंत पावसाचा वेग कमी होत ५३.२४ मिमी प्रतितास राहिला. एका
तासात ८७.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
दरम्यान, ढगफुटीपेक्षा जास्त वेगाने पावसाला सुरुवात झाली होती. ताशी शंभर मिलिमीटर
किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास ढगफुटी म्हटले जाते, अशी
माहिती एमजीएम हवामान केंद्राचे संचालक डॉ. श्रीनिवास औंधकर यांनी दिली.
0 टिप्पण्या