Ticker

6/Breaking/ticker-posts

जिल्ह्यातील 'या' २ तालुक्यात चिंता वाढवली ;, वाढत्या रुग्णसंख्येमुळे निर्बंध कडक

 


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

अहमदनगर : नगर जिल्ह्यात संगमनेर आणि पारनेर तालुक्यातील करोना संसर्ग अटोक्यात येत नाही. त्यामुळे प्रशासनाने कडक उपाययोजना हाती घेतल्या आहेत. पारनेर तालुक्यात बारा गावांसोबतच आता संगमनेर तालुक्यातील ३१ गावांत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यामध्ये अनेक मोठ्या गावांचाही समावेश आहे. त्या त्या गावातील करोना नियंत्रण समितीमार्फत हा निर्णय घेण्यात आला असून कंटेनमेंट झोनचे सर्व नियम तेथे लागू करण्यात आले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून संगमनेर तालुक्यात नगर जिल्ह्यातील सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत. ग्रामीण भागात नियमांचे काटेकोर पालन होत नसल्याचे पाहणीत आढळून आले होते. त्यामुळे आता निर्बंध कडक करण्यात आले आहेत.

संगमनेर तालुक्यातील ३१ गावांमध्ये करोना बाधितांची संख्या वाढत असल्याने ही गावे प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून प्रशासनाने जाहीर केली आहेत. खळी, पिंप्री लौकी अजमपूर, जाखुरी, पानोडी येथील हजारवाडी, राजवाडा, टेकेवाडी, ढोणेवस्ती, तळेगाव दिघे येथील भागवतवाडी, मनोली, घुलेवाडी येथील श्रीराम कॉलनी, कनोली, शेडगाव, पिंपरणे येथील राहिंज वस्ती, निमगाव बुद्रुक गावठाण, निमगावजाळी, आश्वी खुर्द मातंग वस्ती, राजापूर, सायखिंडी नन्नवरे वस्ती व खळी वाडग, गुंजाळवाडी दोन कुटुंब वस्ती, वनकुटे, चिकणी वर्षे वस्ती, आश्वी बुद्रुक, खांडगाव, वडगावलांडगा, मांडवे बुद्रुक, चंदनापुरी, कोल्हेवाडी, चिंचपूर बुद्रुक, निमोण, मेंढवण, मालुंजे, पेमगिरी ही गावे १४ दिवस प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली असून कंटेमेंट झोनचे सर्व नियम तेथे लागू करण्यात आले आहेत. यातील काही गावांत पूर्वीच निर्बंध लावण्यात आल्याने त्यांची मुदत १ ऑक्टोबरला संपणार असून काहींची मुदत त्यानंतरच्या आठवड्यापर्यंत आहे.

 महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचा हा तालुका आहे. विस्तार आणि लोकसंख्येने मोठा असलेल्या या तालुक्यात सुरवातीपासून रुग्ण संख्या अधिक आहे. तेथे आत्तापर्यंत ३२ हजार ३२९ करोना बाधित आढळून आले आहेत. पैकी ३१ हजार ३४७ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या ८७९ रुग्ण करोना बाधित आहेत. दैनंदिन रुग्ण संख्या बहुतांश दिवस शंभरच्या पुढेच आहे. नगर जिल्ह्यात संगमनेर आणि पारनेर तालुक्यात रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे आता दोन्ही तालुक्यांतील गावांत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या