Ticker

6/Breaking/ticker-posts

सारोळा कासार सरपंचाने मनमानी करत परस्पर प्रस्ताव दिल्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे केली तक्रार



 लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

नगर  : प्राथमिक व माध्यमिक शाळेशेजारी असलेली शासकीय जागा घरकुलांसाठी देण्यास ग्रामस्थांनी विरोध केला असून सरपंच यांनी ग्रामपंचायत सदस्य अथवा ग्रामस्थांना विश्वासात न घेता मनमानी करत परस्पर घरकुलासाठी जागा देण्याचा प्रस्ताव दिल्याची तक्रार नगर तालुक्यातील  सारोळा कासार येथील उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

     याबाबत ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने गुरुवारी (दि.९) दुपारी निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांच्या कार्यालयात निवेदन दिले आहे.यामध्ये म्हंटले आहे की, सारोळा कासार गावच्या विद्यमान सरपंच आणि तत्कालीन ग्रामसेवक यांनी गावातील प्राथमिक व माध्यमिक शाळेशेजारी असलेली शासकीय जागा  ही प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलांसाठी प्रस्तावित करून तसा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे दिलेला आहे. वास्तविक पाहता या बाबत ग्रामपंचायतच्या कार्यकारी मंडळाशी कुठलीही चर्चा करण्यात आलेली नाही . ग्रामपंचायतच्या मासिक मिटिंग मध्येही हा विषय चर्चेला घेतलेला नाही. सरपंच यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत मनमानी पद्धतीने हा प्रस्ताव पाठविलेला आहे. यामागील त्यांचा हेतू समजू शकलेला नाही. अतिक्रमणामुळे सरपंच आरती कडूस यांचे पद जिल्हाधिकारी यांनी दोनदा रद्द केलेले आहे. विभागीय आयुक्तांनीही जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय कायम ठेवलेला आहे. सध्या उच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरु असून उच्च न्यायालयाने त्यांना तात्पुरता दिलासा देत पदावर कायम ठेवलेले आहे. या काळात सुद्धा त्यांची मनमानी सुरु आहे, ही बाब गंभीर स्वरुपाची आहे.

         वास्तविक पाहता घरकुलांसाठी सोयीची आणि सरकारी मालकीच्या अन्य काही जागा गावच्या परिसरात लोकवस्ती असलेल्या भागात उपलब्ध असताना शाळेच्या परीसरात घरकुलांसाठी जागा प्रस्तावित करणे कितपत योग्य आहे? त्यामुळे सरपंच यांनी हेतुपुरस्कर आणि मनमानी पद्धतीने दिलेला प्रस्ताव आपण नामंजूर करावा, तसेच गावच्या परिसरात शालेय मुलांना, तरुणांना मैदानी खेळ खेळण्यासाठी, तसेच महिला व ज्येष्ठ नागरिकांना मॉर्निंग वॉक साठी या जागेशिवाय एकही मैदान उपलब्ध नाही. त्यामुळे या ठिकाणी घरकुलांसाऐवजी उद्यान विकसित व्हावे अशी मागणी ग्रामस्थांनी या निवेदनात केली आहे. 

         यावेळी शिक्षकनेते संजय धामणे, माजी सरपंच भानुदास धामणे, तालुका दुध संघाचे संचालक राजाराम धामणे, उपसरपंच जयप्रकाश पाटील, ग्रामपंचायत सदस्य गजानन पुंड, नामदेव काळे, सोसायटीचे चेअरमन संजय काळे, संचालक महेश धामणे, सुभाष धामणे, बाळासाहेब कडूस, गणेश धामणे आदींनी बहुसंख्य ग्रामस्थांच्या सह्या असलेले निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांच्या कार्यालयात दिले.

 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या