लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
पुणे: राज्यात करोनाचा धोका कायम असताना मंदिरे उघडण्यासाठी भाजप आणि मनसे या पक्षांकडून आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली व केंद्रात सत्ता असलेल्या भाजपला कानपिचक्या दिल्या. करोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यातच येत्या काळात गणेशोत्सव व अन्य सण असल्याने महाराष्ट्रात विशेष खबरदारी घेण्यात यावी, गर्दी टाळण्यासाठी निर्बंध लावण्यात यावेत, अशी स्पष्ट सूचना केंद्र सरकारने केली आहे. त्यावर बोट ठेवत शरद पवार यांनी राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी आंदोलनाचे इशारे देणाऱ्या विरोधी पक्षांना फैलावर घेतले.
'करोना संसर्गाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्यासाठी केंद्र सरकारनेच राज्य सरकारला मार्गदर्शक तत्वे दिली आहेत. त्यानुसार आणखी काही दिवस खबरदारी घ्यावी लागणार आहे. राज्य सरकार आणि विशेषत: मुख्यमंत्री कटाक्षाने त्यात लक्ष घालत आहेत. या मार्गदर्शक तत्वांचे पालन व्हावे यासाठी ते आग्रही आहेत. तसे वारंवार आवाहनही ते करत आहेत. केंद्र सरकार एखादी भूमिका घेतं तेव्हा राज्यातील केंद्र सरकारच्या विचारांच्या लोकांनी तरी किमान तारतम्य बाळगण्याची आवश्यकता आहे', अशा खरमरीत शब्दांत शरद पवार यांनी राज्यातील भाजप नेत्यांना कानपिचक्या दिल्या. मंदिरे उघडण्याबाबत अन्य घटकांची विविध मते असू शकतात. लोकशाहीमध्ये तो त्यांचा अधिकारही आहे. मात्र, वस्तुस्थिती प्रत्येकाने लक्षात घेतली पाहिजे. मला यापेक्षा अधिक काही सांगायचे नाही, असेही पवार म्हणाले.
0 टिप्पण्या