लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
अहमदनगरः शेतकऱ्यांचे
काम अधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे सोपे आणि बिनचूक करण्यावर सरकारकडून भर देण्यात
येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून शेतकऱ्यांना पिकांच्या नोंदी सरकारकडे करण्यासाठी ई पीक पहाणी तंत्रज्ञान
आणले आहे. या ऑनलाइन पद्धतीला प्रोत्साहन देण्यासाठी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचले. त्यांच्या हातातील
मोबाईल घेऊन प्रात्यक्षिक करून दाखविले. स्वत: मंत्रीच पुढाकार घेत असल्याने
यंत्रणाही कामाला लागली असून जास्तीत जात शेतकऱ्यांना हे तंत्रज्ञान वापरासाठी
तयार केले जात आहे. थोरात यांच्या संगमनेर तालुक्यात सुमारे ८० टक्के शेतकऱ्यांनी
याचा वापर सुरू केल्याचे सांगण्यात आले.
महाविकास आघाडी सरकारमध्ये महसूल मंत्री
पदाचा कार्यभार घेतल्यानंतर थोरात यांनी ऑनलाईन प्रणालीला प्राधान्य दिले आहे.
सातबारा दुरुस्तीसह डिजिटल सातबारा घरपोच देण्याच्या योजना आणल्या आहेत. त्यापैकीच
ई पीक पाहणी प्रकल्प आहे. याच्या मोबाईल अॅप्लिकेशनद्वारे शेतकरी स्वत: आपल्या
शेतातील पिकांची नोंदणी करू शकतो. यासाठी तलाठ्याकडे जाण्याची, तलाठ्याने शेतावर येण्याची गरज नाही. या
तंत्रज्ञानाची शेतकऱ्यांना माहिती देण्यासाठी ठिकठिकाणी उपक्रम सुरू आहेत. यामध्ये
स्वत: थोरात यांनीही भाग घेतला. आनंदवाडी येथे शेतावर जाऊन शेतकऱ्यांच्या हातातील
मोबाईलमध्ये त्यांना याचे प्रात्यक्षिकही त्यांनी करून दाखविले.
यावेळी बोलताना थोरात म्हणाले, ‘ई
-पीक पाहणी ही नवी योजना शेतकऱ्यांच्या जीवनात नव्या पर्वाची नांदी ठरणार आहे. या
योजनेमुळे सर्वांना स्वतःची पीक पाहणी स्वतः नोंद करता येणार आहे. सध्या राज्यात व
देशात कोणते पीक किती रोपण झाले आहे. व कोणत्या पिकाचे किती उत्पादन होणार आहे.
याची अद्यावत माहिती सुद्धा मिळणार आहे. महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली ही योजना
देशासाठी आदर्शवत ठरणारे आहे. मागील दीड वर्षापासून महसूल मंत्रिपदाच्या काळात आपण
नव्याने ऑनलाईन प्रणालीला प्राधान्य दिले आहे. यातून ऑनलाईन सातबारा ई-फेरफार
शेतकऱ्यांना अत्यंत सुलभ व सोप्या पद्धतीने मिळत आहेत. सातबारावरील अनावश्यक
नोंदी कमी करण्यात आल्या आहेत. दोन ऑक्टोबरला महात्मा गांधी जयंतीपासून सर्व
शेतकऱ्यांना सातबारा घरपोच मिळणार आहे. संगमनेर तालुक्यात मागील वर्षी मॉडेल
म्हणून या ई पिक पाहणी अभियानाची सुरुवात केली. आता संपूर्ण राज्यामध्ये ई पीक
पाहणी लागू करण्यात आली आहे.’
यावेळी प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे, तहसीलदार अमोल निकम, नायब तहसीलदार उमाकांत कडनर, आर. बी. रहाणे, महानंदा व राजहंस दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख, सुनंदाताई जोर्वेकर, मिराताई शेटे, साहेबराव गडाख, अजय फटांगरे, मिलिंद
कानवडे, रामहरी कातोरे उपस्थित होते. ई पीक पाहणी अभियानात
संगमनेर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आहे. १७४ गावांपैकी आनंदवाडी,
रणखांब, मा़ंची, कोळवाडे,
विद्यानगर, खांडगाव,खांडगेदरा
या सात गावांमध्ये शंभर टक्के नोंदणी झाली आहे. तर उर्वरित गावांमधील ८०
टक्केपर्यंत पोहचली आहे.
0 टिप्पण्या