बाजार समितीच्या भ्रष्ट कारभारावर शिक्कामोर्तब : महाविकास आघाडी
लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
बाजार समितीच्या गैरकाराकामकाजावर विरोधकांनी विविध मुद्यांवर आक्षेप घेतले असून याबाबत सरकार दरबारी तक्रारी केल्या आहेत. विरोधकांनी आक्षेप घेतलेल्या मुद्यांची चौकशी समितीनेही चौकशी करुन अहवाल दिला आहे.
अहवालात बाजार समितीचा गैरकारभार चव्हाट्यावर आल्याने सरकारने नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. दरम्यान पत्रकार परिषद घेवून नगर तालुका महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बाजार समितीत घोटाळ्याचे सत्र सुरुच असल्याचा आरोप केला आहे. पत्रकार परिषदेला जिल्हा परिषद सदस्य संदेश काले, शरद झोडगे, बाळासाहेब हराळ, गोविंद मोकाटे, माजी सभापती रामदास भोर, उपसभापती डॉ. दिलीप पवार, नगर तालुकाप्रमुख राजेंद्र भगत, संदीप गुंड, व्ही. डि. काळे, गुलाब शिंदे , केशव बेरड आदी उपस्थित होते.
संदेश कार्ले म्हणाले, महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री अधिनियमन १९६३ चे कलम ४५ ( १ ) अन्वये नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. नगर तालुका महाविकास आघाडीच्यावतीने बाजार समितीतील गैरकारभार थांबवावा, यासाठी अनेक वेळा आंदोलने केली. परंतु, बाजार समितीतील गैरकारभार थांबला नाही. कर्मचारी भरती, प्रॉव्हिडंड फंड, कर्ज, गाळे विक्री तसेच बांधकाम याबाबत तक्रारी केल्या होत्या. याबाबत दोन वेळा चौकशी समिती नेमण्यात आली होती. दोन्ही समितीने अहवाल दिले आहेत. त्यात अनेक मुद्यांवर गंभीर आक्षेप नोंदविण्यात आले आहेत. त्यामुळे राज्यात नावलौकिक असलेली बाजार समिती डबघाईला जाण्याची चिन्हे आहेत. बाजार समिती वाचविण्यासाठी आमची लढाई असल्याचे कार्ले यांनी सांगितले.
पाच वर्षांचे स्पेशल ऑडिट करावे : हराळ
नगर तालुका बाजार समितीमध्ये अनेक घोटाळ्यांची प्रकरणे
बाहेर येत आहेत. २०१८ पासून बाजार समितीची दोन चौकशी समित्यांमार्फत चौकशी सुरु
आहे. याच चौकशी समितींच्या अधिकार्यांनी चौकशी अहवाल सादर केला आहे. त्याच
अनुषंगाने सरकारने बाजार समितीला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. बाजार समिती
वाचविण्यासाठी पाच वर्षांचे स्पेशल ऑडिट करण्याची मागणी सरकारकडे करणार असल्याचे
नगर तालुका महाविकास आघाडीचे नेते बाळासाहेब हराळ म्हणाले.
0 टिप्पण्या