लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
अहमदनगर: भाजपचे नेते किरीट सोमय्या सतत काही तरी आरोप करीत असतात, मात्र त्यांना राज्यात कोण किती गांभीर्याने घेते हे सर्वांनाच माहिती
आहे. तथ्यहीन आरोप करून आघाडीच्या नेत्यांची जनतेतील प्रतिमा खराब करण्याची भाजपची
नीती आहे, असा आरोप सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी केला.
बीड जिल्ह्यात पावसामुळे
झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी जाताना मुंडे काही काळ नगरमध्ये थांबले होते.
त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्याचे माजी गृहमंत्री व
राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांची ईडीकडून होत असलेल्या चौकशीबद्दल विचारले
असता ते म्हणाले, देशमुख
यांना क्लीन चीट देण्यात आल्याचे आपण सर्वांनी पाहिले आहेच. मात्र, तरीही त्यांना विनाकारण त्रास देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भाजपचे हे
घाणेरडे राजकारण सुरू आहे. केंद्रीय तपास यंत्रणांच्या कामात हस्तक्षेप करून चौकशा
लावल्या जातात. आरोपांत तथ्य नसले तरी आघाडीच्या नेत्यांची समाजात बदनामी करणे हा
त्यांचा उद्देश असतो. यासंबंधी नावांची यादी जाहीर करणारे किरीट सोमय्या यांना कोण
किती गांभीर्याने घेते, हे आपल्याला माहिती आहेच.
त्यामुळे ते काय बोलतात, त्याने फरक पडत नाही.'
अधिकाऱ्यांच्या बदल्यांसंबंधी मुंडे म्हणाले, गेल्या २० ते २५ वर्षांपासून अनेक
अधिकारी मंत्रालयात अगर विभागात एकाच जागी ठाण मांडून होते. त्यांच्या आता बदल्या
करण्यात येत आहेत. एकाच जागी थांबल्याने होणारी मक्तेदारी सहन केली जाणार नाही.
अर्थात या सर्व बदल्या कायद्याला धरूनच होत आहेत. राज्यपालांच्या भेटीत नेत्यांची
आणखी कोणकोणत्या विषयांवर चर्चा झाली, हे आपल्याला सांगता
येणार नाही, असेही ते म्हणाले.
पावसाने झालेल्या
नुकसानीबद्दल ते म्हणाले, नगर
आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांत अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. त्यावर
काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली. यासंबंधी पंचनामे करण्याचा आदेश देण्यात
आला आहे. त्यातून नेमके नुकसान समोर येईल. ज्यांचे नुकसान झाले आहे, त्यांना भरपाई देण्यासाठी सरकार सकारात्मक आहे. त्यासंबंधीही लवकरच
निर्णय घेतला जाईल, असेही मुंडे म्हणाले.
0 टिप्पण्या