खरवंडी कासार येथिल सुनिल साहेबराव अंदुरे यांच्या निवासस्थानी स्थानापन्न आकर्षक गौराई
लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
नगर/पाथर्डी खरवंडी कासार : मगंलमुर्ती श्रीगणेशाच्या प्रतिष्ठापना झाल्यानंतर वाजतगाजत जल्लोषात घराघरांमध्ये गौरीचे आगमन झाले. सोन्याच्या पावलांनी आलेल्या ज्येष्ठा-कनिष्ठा गौरीच्या आगमनानतंर तिन दिवस घरामध्ये मोठे चैतन्य व आनंदी वातावरणात उत्सव साजरा होतो. व्यापार नोकरीसाठी ठिक ठिकाणी विखुरलेले कुटूंब दिवाळी दसरा सणाप्रमाणे या सणासाठी एकत्र येत मोठया उत्साहात गौरीचे पुजन करतात. आकर्षक सजावट व आरस करत मनोभावे सेवा करतात.
घरोघरी गौरी आगमनासाठी सकाळपासूनच गृहिणींची लगबग सुरू असते. गौरी स्थानापन्न होणार असल्याने स्वच्छता व सजावट करण्यात त्या गुंतलेल्या दिसतात. गणेशोत्सवाप्रमाणेच गौरींच्या आगमनानंतर सजावट करण्यात येत असल्याने घराघरांत महालक्ष्मींची स्थापना झाल्यानंतर विविध प्रकारची आकर्षक सजावटही करण्यात आली आहे काही घरात भांडयांचा गजर करत लक्ष्मीचे आवाहन करण्यात आले, तर काही घरात ज्येष्ठा व कनिष्ठांच्या भेटीनंतर जल्लोष करून साखर वाटण्यात येते .माहेरवाशीण असलेल्या गौरीच्या आगमनानंतर घरामध्ये नवचैतन्य निर्माण झाले.
राज्यात ब-याच ठिकाणी उभ्या गौरी बसवण्याची प्रथा आहे. नवीन खण-साडी, बांगडय़ा, पैंजण, बोरमाळ, चपला हार, नथ, कमरपट्टा, वेणी, नथ, जोडवे, ठुशी, राणीहार, चपलाहार असे पारंपरिक दागिने, शेवंतीची वेणी व कुंकू लावून उभ्या गौरीला सजवले जाते. गौरी माहेरवाशीण म्हणून येत असल्याने माहेरी आलेल्या मुलीचे जसे लाड केले जातात तसेच लाड गौरीचे केले जातात. त्यासाठी लाडू-चिवडय़ाची आरास, पुरणपोळीचा नैवेद्य, हळदीकुंकू, सवाष्ण जेवण घालून केले जातात.अंगणातील तुळशीजवळ, वड-पिंपळ किंवा औंदुबरासारख्या पवित्र झाडाजवळ गौरीच्या मुखवटय़ाची पूजाआरती केली जाते. त्यानंतर या ठिकाणाहून जमिनीवर हळदीकुंकवाची पावलांचे ठसे उमटवत गौरी घरात आणल्या जातात. यावेळी ‘गौरी आल्या.. कशाच्या पायी? सोन्याचांदीच्या पायी.. गौरी आल्या.. कशाच्या पायी. बाळगोपाळांच्या पायी..’ असे म्हणण्याची प्रथा आहे. आगमन झाल्यानंतर रात्री बाजरीची भाकरी व मेथीच्या भाजीचा नैवेद्य दाखवला जातो. गौराईचे अलंकार, फळे, हार ,गजरे, दूध, वस्त्रमाळा, तोरण, केळीचे पान, मुखवटे खरेदीसाठी सकाळी बाजारात महिलांची झुंबड होती.
नगरमधील गुजरगल्लीतील श्री स्वामी समर्थ महाराजांच्या रेखी मठात महालक्ष्म्यांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. माजी प्राचार्या डॉ.अमरजा रेखी यांनी पारंपारिक मुगुटा ऐवजी गणपती व महालक्ष्मिंना आकर्षक फेटे बांधले आहेत.
गौरी आगमनानंतर तयारी नैवेद्याची
गौरीच्या आगमनानंतर दुस-या दिवशी पंचपक्वान्नांचा नैवेद्य दाखवला जातो. १६ वेगवेगळ्या भाज्यांचा समावेश असतो त्यामुळे बाजारात या भाज्याला तेजी असते सफरचंद, संत्री, मोसंबी, सीताफळ, केळी आदी फळा ना गौरीसमोर मांडण्यात येते . दिवाळी सणासाठी जसे फराळ बनवले जातात, तसे पदार्थ या दिवशी बनवले जातात.
0 टिप्पण्या