लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
पुणे: राज्यातील महाविकास आघाडीचे अनेक नेते सध्या
सक्तवसुली संचालनालयाच्या ईडी चौकशीच्या
फेऱ्यात अडकले असून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज पुणे येथे माध्यमांशी बोलताना यावर थेट शब्दांत टीका केली. '
हा गैरप्रकार महाराष्ट्रापुरताच मर्यादित नाही तर अन्य राज्यांत
देखील हे चालले आहे', असे म्हणत शरद पवार यांनी केंद्रातील
मोदी सरकारला लक्ष्य केले.
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख, राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे,
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांची गेल्या काही काळापासून ईडी चौकशी सुरू आहे. देशमुख प्रकरणात आता परिवहन मंत्री
अनिल परब यांनाही चौकशीसाठी बोलावले गेले आहे. या सगळ्याबाबत माध्यमांनी प्रश्न
विचारला असता शरद पवार यांनी ईडी या तपास यंत्रणेचा वापर होत असल्याचाच थेट आरोप
केला.
'देशात ईडी या तपास यंत्रणेचा आजवर
अशाप्रकारे कधीच वापर केला गेला नाही. हल्लीचं सरकार विरोधकांना नमवण्यासाठी या
यंत्रणेचा वापर करण्याची भूमिका घेताना दिसत आहे. हे फक्त महाराष्ट्रातच नाही तर
अन्य राज्यातही चाललं आहे', असे शरद पवार म्हणाले. आपण फक्त
महाराष्ट्रातील आपल्याला माहीत असलेल्या लोकांची चर्चा करत आहोत पण हा गैरप्रकार
महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही तर पंजाब, राजस्थान, मध्य प्रदेश यासह दक्षिणेतील काही राज्यांमध्येही सुरू आहे, असेही पवार पुढे म्हणाले.
दरम्यान, शरद पवार यांनी याआधीही
अशाप्रकारचा आरोप केलेला आहे. सीबीआय आणि ईडी या केंद्रीय तपास यंत्रणांचा
सरकारकडून विरोधकांविरुद्ध वापर केला जात असल्याचे ते सातत्याने बोलत आले आहे.
ईडीने शरद पवार यांना नोटीस धाडली होती. तेव्हाही पवार यांनी थेट शब्दांत आव्हान
दिले होते.
0 टिप्पण्या