Ticker

6/Breaking/ticker-posts

लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर आता राजकारणाच्या फडात ; दोन दिवसांत ‘या’ पक्षात करणार प्रवेश

 


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

पुणे : आपल्या दिलखेचक अदांनी रसिकांना घायाळ करणाऱ्या लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर लवकरच राजकारणात प्रवेश करणार आहेत. १६ सप्टेंबर रोजी सुरेखा पुणेकर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. सुरेखा पुणेकर यांच्यासोबतच इतर १६ कलाकारही मनगटावर राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ हातात बांधणार आहेत. 


काही दिवसांपूर्वी सुरेखा पुणेकर यांनी विनायक मेटे यांच्या शिवसंग्राम पक्षाकडून बिलोली विधानसभा मतदार संघाची पोटनिवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं होतं. एका मेळाव्यात त्या शिवसंग्रामच्या व्यासपीठावरही बसल्या होत्या. दरम्यान, याआधीही प्रिया बेर्डे, विजय भाटकर, आनंद शिंदे यांच्यासह अनेक कलाकारांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. 


गेल्या अनेक महिन्यांपासून सुरेखा पुणेकर राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. जुलै महिन्यात त्यांनी स्वतः विधानसभेची निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं.


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षप्रवेशाबाबत बोलताना सुरेखा पुणेकर म्हणाल्या की, "चित्रपट, साहित्य, कला, सांस्कृतिक विभाग मुंबई अध्यक्ष मनोज शंकर व्यवहारे यांच्या मार्गदर्शनाखाली येत्या १६ सप्टेंबरला मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहे. मी आतापर्यंत कलेची सेवा केली. आता मला राजकारणातून जनतेची सेवा करायची आहे. महिलांचे, गोरगरिबांचे प्रश्न सोडवायेच आहेत. त्यामुळे  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मला प्रवेश घ्यायचा आहे."


दरम्यान, बिलोलीची विधानसभेची जागा ही काँग्रेसची आहे. रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनानंतर रिक्त झालेली जागा आता राष्ट्रवादी काँग्रेस लढवणार का? आणि राष्ट्रवादीला ही जागा लढवण्याचा निर्णय झाल्यास पुणेकरांना तिकीट मिळणार का? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. याआधीही सुरेखा पुणेकर राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदार होण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं दिसून आलं होतं. मात्र त्यांना पक्षाकडून काहीच प्रतिसाद मिळत नसल्याचं त्यांनी स्वतः बोलून दाखवलं होतं. अशातच आता अखेर सुरेखा पुणेकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे बिलोली विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणूकीत सुरेखा पुणेकरांना राष्ट्रवादीकडून तिकीट मिळणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या