लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
वॉशिंग्टन: पाकिस्ताननेच तालिबानला पोसले असल्याचा स्पष्ट आरोप भारताने शनिवारी केला.
अफगाणिस्तानातील स्थितीवर भारत आणि अमेरिकेचे बारकाईने लक्ष आहे,’ असेही परराष्ट्र सचिव हर्षवर्धन शृंगला यांनी म्हटले. शृंगला सध्या
अमेरिकेच्या दौऱ्यावर असून, ते पत्रकारांशी बोलत होते.
अफगाणिस्तानातील परिस्थिती सध्या खूपच अस्थिर आणि संदिग्ध आहे. भारत इतक्यात तरी
तेथे कोणत्याही स्वरूपाचा सहभाग घेण्याची शक्यता नसल्याचेही हर्षवर्धन शृंगला
यांनी म्हटले.
अफगाणिस्तानातील
सद्यस्थिती, पाकिस्तान आणि त्याचबरोबर क्वाड संघटना याविषयी
शृंगला यांनी अमेरिकी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. ‘अफगाणिस्तानातील
स्थितीबाबत कोण कशी भूमिका बजावत आहे, यावर त्यांचे
(अमेरिका) बारकाईने लक्ष असेल. पाकिस्तान अफगाणिस्तानचा शेजारी आहे, त्यांनीच तालिबानला पोसले आहे. अशाच अनेक घटकांना पाकिस्तानने बळ दिले
आहे. संयुक्त राष्ट्रांनी निर्बंध घातलेल्यांमध्ये ‘जैश-ए-महंमद’
आणि लष्कर-ए-तैयबा यांचाही समावेश आहे. या दोन गटांनी पूर्वीही
अफगाणिस्तानात भूमिका बजावली आहे, आताही त्यांच्यावर लक्ष
असेलच. पाकिस्तानकडे आम्ही त्या संदर्भात पाहतो,’ असे शृंगला
म्हणाले. शृंगला यांनी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकेन यांचीही भेट
घेतली
‘ भारताने
तालिबानबाबत ‘थांबा आणि पाहा’असे धोरण
स्वीकारले आहे,’ याचा त्यांनी पुनरुच्चार केला. भारत आणि
अमेरिका यांच्यातील ‘टू प्लस टू’स्तरीय
चर्चा नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. अमेरिकेचे पर्यावरणविषयक विशेष दूत जॉन
केरी भारत दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे, अशीही माहिती
शृंगला यांनी दिली.
सुरक्षा परिषदेत भारताची महत्त्वाची भूमिका
भारताने संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या
अध्यक्षपदाच्या एका महिन्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावल्याची प्रतिक्रिया
परराष्ट्र सचिव हर्षवर्धन शृंगला यांनी दिली. अफगाणिस्तानबाबत ठराव संमत
करण्यामध्ये भारताची भूमिका सकारात्मक असल्याचे ते म्हणाले. हा ठराव म्हणजे
सर्वसमावेशक असा राजकीय संमतीने करण्यात आला होता. भारताच्या अध्यक्षपदाच्या काळात
तो होत असल्याने भारतासाठी तो खूप महत्त्वाचा होता, असे ते म्हणाले.
‘दहशतवादाबाबत चिंता’
भारताचे कतारमधील राजदूत दीपक मित्तल
यांनी नुकतीच तालिबानचा प्रतिनिधी शेरमहंमद स्तानेकझाई याच्याशी दोह्यामध्ये चर्चा
केली. ‘या भेटीत अफगाण
भूमीवरून भारतविरोधी दहशतवादी कारवाया होऊ देऊ नयेत. त्याचबरोबर, अफगाणिस्तानात अद्याप अडकलेले भारतीय नागरिक आणि ज्यांना भारतात अडकलेले
अफगाण नागरिक यांच्या प्रवासात अडथळे येऊ नयेत, यावर भर दिला,’
असे परराष्ट्र सचिव शृंगला यांनी स्पष्ट केले.
क्वाड’ बैठकीबाबत
साशंकता
जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा या
महिनाअखेरीस पद सोडणार आहेत. यामुळे क्वाड देशांच्या बैठकीवर परिणाम होईल का, असे विचारता शृंगला म्हणाले, ‘ही परिषद झाल्यास त्याला उपस्थित राहू, असे
पंतप्रधानांनी म्हटले आहे. इतर नेत्यांचीही अशीच भूमिका असावी.’ ही बैठक २३ आणि २४ सप्टेंबरला वॉशिंग्टनमध्ये होण्याची शक्यता आहे. या
वेळी पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांची भेट होण्याचीही शक्यता
आहे.
‘थांबा आणि वाट पाहा’
भारत आणि अमेरिका अफगाणिस्तानमधील
पाकिस्तानच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवून आहेत. तसेच, भारताने तालिबानशी मर्यादित चर्चा केली
असून, अफगाणिस्तानच्या नवीन राज्यकर्त्यांनी भारताच्या चिंता
दूर करण्यासाठी व्यावहारिक दृष्टिकोन स्वीकारण्याचे संकेत दिले आहेत, अशी माहिती परराष्ट्र सचिव हर्षवर्धन शृंगला यांनी दिली. अफगाणिस्तानात
परिस्थिती कशी असेल, याबाबत सध्या अमेरिकेने ‘थांबा आणि वाट पाहा’ असे धोरण स्वीकारले. भारताचे
धोरणही असेच आहे, असे ते म्हणाले.
0 टिप्पण्या