प्रा.डॉ.अशोक कानडे यांना शैक्षणिक कार्यगौरव पुरस्कार प्रदान
पाथर्डी : प्रा.डॉ. अशोक कानडे यांना ज्ञानोदय बहुउद्देशीय संस्था टाकळीभान च्या वतीने राज्यस्तरीय शैक्षणिक कार्यगौरव पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. याप्रसंगी आ. लहू कानडे,आ.डॉ.सुधीर तांबे,कुलगुरू डॉ.पंडित विद्यासागर,डॉ.वंदना मुरकुटे, प्रा.डॉ. बाबुराव उपाध्ये,डॉ.ज्ञानेशानंद महाराज, प्रकाश केदारी, श्रीमती साईलता सामलिटी उपस्थित होते.
या मान्यवरांच्या शुभहस्ते प्रा.डॉ.अशोक कडूभाऊ कानडे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. डॉ. कानडे तेवीस वर्षापासून पाथर्डी येथील बाबुजी आव्हाड महाविद्यालयात इतिहास अध्यापनाचे कार्य करत आहेत. राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी म्हणून दहा वर्ष त्यांनी काम पाहिले. बाबूजी आव्हाड स्मृति व्याख्यानमालेचे समन्वयक म्हणून मागील अकरा वर्षांपासून काम पाहतात. 'अहमदनगर जिल्ह्यातील यादवकालीन मंदिराचा अभ्यास' याविषयावर संशोधन पूर्ण झालेले असून डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडून त्यांना पी.एच.डी पदवी प्राप्त झाली आहे. ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व महाराष्ट्राच्या विविध विद्यापीठातील इतिहासाचे मार्गदर्शक म्हणुनही काम पाहतात.
आजपर्यंत विद्यापीठस्तरीय, राज्यस्तरीय, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चर्चासत्रामध्ये त्यांनी सहभाग नोंदवून विविध विषयावर शोधनिबंध वाचन आणि प्रकाशन केलेले आहे. त्यांचे दोन संदर्भ ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत. महाविद्यालयाच्या विविध कार्यक्रमात यांचा सक्रिय सहभाग असतो. इतिहास विभागाच्या वतीने महाविद्यालयात दोन राज्यस्तरीय व चार राष्ट्रीय स्तरावरील सेमिनारचे आयोजन केलेले आहेत.अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेचे राष्ट्रीय अधिवेशन महाविद्यालयात आयोजित करून महाराष्ट्र व भारतातील नामवंत तज्ञ अभ्यासक, कुलगुरू, व्याख्याते, इतिहासाचे अभ्यासक यांना निमंत्रित केले होते, तसेच शिवकालीन शस्त्र प्रदर्शन, अजंठा वेरूळ शिल्प प्रदर्शन, शिवकालीन किल्ले प्रदर्शन, डेक्कन अभिमत विद्यापीठाचे प्राचीन वास्तू संग्रहालयाचे प्रदर्शन भरवुन पाथर्डी तालुक्यातील सर्व शैक्षणिक संस्थेमधील विद्यार्थ्यांना प्रदर्शन पाहण्याची संधी प्राप्त करून दिली. ते अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेचे कार्यकारिणी सदस्य, शब्दगंध साहित्यिक परिषदेचे कार्यवाह आहेत.
या सर्व कार्याची दखल घेऊन ज्ञानोदय संस्थेने पुरस्कारासाठी त्यांची निवड केली होती, त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अभयराव आव्हाड, उपाध्यक्ष अँड. सुरेशराव आव्हाड, अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. जयसिंगराव पवार, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी.पी. ढाकणे, शब्दगंध साहित्यिक परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र उदागे, संस्थापक सचिव सुनील गोसावी यांच्यासह आदीनी अभिनंदन केले आहे.
0 टिप्पण्या