लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
नगर ‘राज्यातील
मंदिरे उघडण्यासाठी महाविकास आघाडी सरकारला घटस्थापनेचा मुहूर्त सापडला असला तरी
केवळ भाजपच्या मागणीला विरोध म्हणून इतके दिवस मुख्यमंत्र्यांनी हा विषय व्यक्तिगत
प्रतिष्ठेचा केला होता का?’असा सवाल भाजप नेते आणि माजी
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे.
राज्य सरकारचा राज्यातील धार्मिक स्थळे
उघडण्यास परवानगी देण्याचा निर्णय आणि आरोग्य विभागाची रद्द झालेली परीक्षा या
विषयांवर विखे पाटील यांनी सड्कून टिका केली. विखे पाटील म्हणाले, ‘इतर राज्यांमध्ये नियमावली करुन
मंदिरे केव्हाच उघडण्यात आली. तिरुपती देवस्थान, वैष्णोदेवी
यासारखी मोठी देवस्थानही करोना नियमांचे पालन करुन भाविकांसाठी उघडण्यात आली.
आपल्या राज्यात मात्र मंदिरे उघडण्यास महाविकास आघाडी सरकारने जाणीवपूर्वक उशीर
केला. केवळ भाजपाची मागणी होती म्हणून हा प्रश्न सरकारने व्यक्तिगत केला.
राज्यात जिथे तीर्थस्थाने आहेत, तेथील गावांचं अर्थकारण दोन
वर्षापासून मंदिरे बंद झाल्यापासून अडचणीत आलं आहे. त्यातून काही ठिकाणी आत्महत्या
सुरू झाल्याची जाणीव महाविकास आघाडी सरकारने ठेवली नाही,' असा
हल्लाबोल त्यांनी केला आहे.
' राज्यात एकीकडे मॉल सुरू झाले,
बियरबार सुरू होते, एस.टी बसेसही सुरू झाल्या,
मग फक्त भाविक मंदिरात गेल्यानेच करोना होणार होता का? हा नकारात्मक दृष्टीकोन घेवून मुख्यमंत्री काम करणार असतील तर राज्याचा
विकास कारण्याच्या केवळ गप्पा ठरल्या आहेत. जनतेचा त्यांच्यावर भरवसा
राहिलेला नाही,’ असंही विखे पाटील म्हणाले. आरोग्य
विभागाच्या परीक्षेच्या संदर्भात झालेल्या गोंधळावर बोलताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी ठाकरे सरकारवर
निशाणा साधला आहे. ‘ महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयांचा
गोंधळ रोजच सुरू आहे. त्याचे परिणाम विद्यार्थ्यांना भोगावे लागत आहेत. महाविकास
आघाडी सरकार सगळ्याच परीक्षेत नापास झाले आहे. सरकारच्या अनिश्चिततेचा परिणाम
जनतेला भोगावा लागत आहे,’ अशी खरमरीत टीकाही त्यांनी केली.
0 टिप्पण्या