Ticker

6/Breaking/ticker-posts

'गडकरी साहेब तुम्ही बोलता गोड, पण...'; 'त्या' पत्रावर CM ठाकरे यांची टोलेबाजी

 






लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

नागपूर: शिवसैनिकांची तक्रार करणारा लेटरबॉम्ब टाकल्यानंतर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज नागपूर मेट्रोच्या कस्तुरचंद पार्क आणि झिरो माइल स्थानकाच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त एकत्र आले. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी भाषणाच्या ओघात नितीन गडकरी यांना सणसणीत टोला हाणला.

नितीन गडकरी यांनी काही दिवसांपूर्वीच थेट मुख्यमंत्री ठाकरे यांना एक खरमरीत पत्र लिहून शिवसैनिकांबद्दल तक्रार केली आहे. महामार्ग  रस्ते बांधणीची कामे करत असताना त्यात शिवसैनिकांकडून अडथळे आणले जात आहेत. काही ठिकाणी कंत्राटदारांना धमक्या दिल्या जात आहेत. हे असेच सुरू राहिल्यास महाराष्ट्रातील कामे थांबवावी लागतील. त्यामुळे आपण महाराष्ट्राचे नुकसान टाळण्यासाठी तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी गडकरी यांनी या पत्रात केली होती. या पत्राची दखल घेत मुख्यमंत्री ठाकरे यांनी चौकशीचे आदेश दिलेले असून या पत्रानंतर दोन्ही नेते आज नागपूरमधील मेट्रोच्या कार्यक्रमानिमित्त एकत्र आले. नितीन गडकरी प्रत्यक्ष कार्यक्रमात सहभागी झाले होते तर मुख्यमंत्री ऑनलाइन होते.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी बोलताना अत्यंत खोच शब्दांत गडकरींना टोला लगावला. ' गडकरी साहेब तुम्ही बोलता गोड, पण पत्र कडक लिहिता', असं मुख्यमंत्री म्हणाले. पुढे त्यांनी गडकरींना आश्वस्तही केले. गडकरी आणि आमचे नाते थोडे वेगळे आहे. ते कर्तव्यकठोर आहेत आणि आम्हीही कर्तव्यकठोर आहोत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आम्हाला जी शिकवण आहे, त्याची तुम्हालाही कल्पना आहे. जनतेशी कधीही गद्दारी करायची नाही. जनतेचा विश्वासघात करायचा नाही. जनतेच्या विकासाशी संबंधित कामात अडथळा येऊ द्यायचा नाही, असं बाळासाहेब सांगायचे. ते आम्ही पाळत आलो आहोत. म्हणून तुमच्या पत्राचा हलका-फुलका उल्लेख मी येथे केला असला तरी कोणत्याही प्रकारे जनतेच्या विकासकामांच्या आड मी कुणालाही येऊ देणार नाही, अशी ग्वाहीच यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी गडकरी यांना दिली. वरून धावणारी मेट्रो छान दिसते, पण मेट्रोच्या खालीही लक्ष द्या, असा सल्ला यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यवस्थापनाला दिला.

नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला मंजुरी देऊन प्रस्ताव कॅबिनेटकडे पाठवल्याबद्दल या कार्यक्रमात नितीन गडकरी यांनी केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांचे आभार मानले. नागपुरात देशातील एकमेव २० मजल्यांचे मेट्रो स्टेशन साकारत आहे. तेलनखेडी येथील ६ मजली पार्किंग ऑक्टोबरमध्ये पूर्ण होणार, असेही गडकरी यावेळी म्हणाले.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या