*पुणे येथे मराठा समाजाची
राज्यस्तरीय बैठक.
*पुढचे मूक आंदोलन अशोक चव्हाणांच्या नांदेडात
लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
पुणे: मराठा आरक्षणाची लढाई आपण संयमाने लढत आहोत. ठरवलं
तर या प्रश्नावर दोन मिनिटांत महाराष्ट्र पेटून उठू शकतो पण आपल्याला ते करायचे नाही. मराठा आरक्षणाच्या लढ्यात
ताकदीसोबतच जो संयम आणि शिस्त आपण दाखवली आहे ती आपल्याला यापुढेही पाळावी लागेल,
असे सांगताना मराठा समाजाला न्याय मिळवून देणारच असा विश्वास खासदार संभाजीराजे यांनी व्यक्त केला. पुढचं मूक आंदोलन नांदेडला करण्यात येईल असे जाहीर
करतानाच याप्रश्नावर समाज सांगेल तितके दिवस आपण उपोषणाला बसायला तयार असल्याचेही
यावेळी संभाजीराजे यांनी नमूद केले.
पुणे येथे मराठा समाजाची राज्यस्तरीय बैठक सुरू झाली
असून मराठा समाजाने सरकारकडे केलेल्या मागण्यांचा जिल्ह्यातील समन्वयकांकडून
विषयवार आढावा घेतला जात आहे. या बैठकीत आज संभाजीराजे यांनी मार्गदर्शन केले व
आक्रमक भूमिका मांडली. मराठा आरक्षणाचा लढा आरक्षण मिळेपर्यंत सुरूच राहणार असून
पुढचं आंदोलन मंत्रिमंडळाच्या मराठा आरक्षणविषयक उपसमितीचे अध्यक्षअशोक चव्हाण यांचे नांदेडात करण्याची घोषणा
संभाजीराजे यांनी यावेळी केली. याआधी कोल्हापुरातून या आंदोलनाला सुरुवात झाली
असून नाशिकमध्येही आंदोलन करण्यात आले आहे. सरकारच्या आश्वासनानंतर हे आंदोलन
स्थगित करण्यात आले होते.
राज्यातील
कोविड स्थिती आणि काही दिवसांपूर्वीची पूरस्थिती पाहता आम्ही शांत राहिलो.
परिस्थितीचं भान आम्ही राखलं पण आमच्या प्रश्नांचं काय, याचं उत्तर सरकारला द्यावंच
लागणार आहे. जो वंचित आहे त्याला आरक्षण मिळालंच पाहिजे ही माझी स्पष्ट भूमिका
असून मराठा समाजाला टिकणारं आरक्षण कसं द्यायचं हे सरकारने ठरवायला हवं. ती
सरकारचीच जबाबदारी आहे. त्यासाठी डोकं लावा, असा सल्ला
संभाजीराजे यांनी दिला. मी मॅनेज होणारा नेता नाही, असे
सांगताना माझ्यावर विश्वास ठेवा. आंदोलन करायचं की काय करायचं हे तुम्ही सगळ्यांनी
ठरवा. तुम्ही जे म्हणाल ते करायला मी तयार आहे. तुम्ही सांगितलं तर मी उपोषणाला
बसायलाही तयार आहे. तुम्ही सांगाल तितके दिवस मी उपोषणाला बसेन, असेही संभाजीराजे यांनी यावेळी सांगितले.
0 टिप्पण्या