लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
परभणी: परभणीचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर शनिवारी
निवृत्त झाले. मुगळीकर यांच्या जागी आंचल गोयल यांची
नियुक्ती राज्य शासनाकडून करण्यात आली होती. मात्र, नाट्यमय घडामोडीनंतर
जिल्हाधिकारी दीपक मुंगळीकर यांच्या निवृत्तीच्या वेळी अचानक अतिरिक्त
जिल्हाधिकारी राजेश काट्कर यांच्याकडे पदभार सोपवला
गेला.
खरंतर आंचल गोयल या परभणी जिल्ह्यात दोन दिवस आधीच दाखल झाल्या होत्या मात्र, शनिवारी
पालकमंत्री नवाब मलीक यांच्या
कुठल्याही कार्यक्रमात आंचल गोयल ह्या उपस्थित नव्हत्या. त्यामुळेच आंचल गोयल
यांच्या बदलीच्या हालचाली पडद्यामागे सुरू असल्याचं बोललं जातं होतं. अखेर
संध्याकाळी आंचल गोयल यांना राज्य सरकारने तातडीने परत मुंबईला बोलावले असल्याची
माहिती समोर आली आणि जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेश
काटकर यांच्याकडे पदभार सोपविला. आंचल गोयल या डॅशिंग आणि कडक शिस्तीच्या अधिकारी
म्हणून ओळखल्या जातात. जिल्ह्यातील नेत्यांना त्या नको होत्या. त्यामुळेच राजकीय
नेत्यांच्या दबावापोटी सरकारने त्यांची परभणीतील नियुक्ती रद्द केली असल्याची
चर्चा संपूर्ण जिल्ह्यात सध्या रंगली आहे. याबाबत गोयल यांच्याकडून मात्र अद्याप
काहीच भाष्य करण्यात आलेलं नाही.
दरम्यान, मुंगळीकरांच्या निवृत्तीनंतर आता अतिरिक्त
जिल्हाधिकारी राजेश काटकर हे परभणीचे जिल्हाधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. मात्र
आंचल गोयल यांच्या जागी परभणी जिल्हाधिकारी म्हणून कोणत्या अधिकाऱ्याची नियुक्ती
केली जाते हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.
अचानक आदेश आला
आणि...
जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर हे आंचल गोयल
यांच्याकडे पदाची सूत्रे सोपवणार आणि सेवानिवृत्त होणार हे निश्चित झाले होते.
त्यानुसार तयारीही झाली होती. मात्र सामान्य प्रशासन विभागाचे सह सचिव अजित पाटील
यांच्या स्वाक्षरीने आदेश आला आणि सगळ्यांनाच धक्का बसला. '३० जुलैच्या आदेशामध्ये अंशत: बदल
करण्यात येत असून आपण आपल्या पदाचा अतिरिक्त कार्यभार आंचल गोयल यांच्याऐवजी
अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवून सेवानिवृत्त व्हावे', असे
आदेशात नमूद करण्यात आले होते. त्यानुसार तातडीने कार्यवाही करण्यात आली.
0 टिप्पण्या