*भाजप
प्रदेशाध्यक्षपदासाठी राम शिंदे यांचेही नाव चर्चेत.
*फडणवीस
सरकारमध्ये शिंदे यांच्याकडे होती १४ खाती.
लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
अ.नगर: भारतीय जनता पक्षाच्या
प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या चर्चेत आता आणखी एक नाव पुढे आले आहे. नगर जिल्ह्यातील
माजी मंत्री व भाजप नेते
प्रा. राम शिंदे यांचे
नाव त्यांच्या समर्थकांमधून पुढे करण्यात येत आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
यांचे निकटवर्तीय आणि ओबीसी समाजाचे
नेते, मंत्री असताना अनेक खाती
सांभाळण्याचा अनुभव, पक्षात विविध पदांवर कामाचा प्रदीर्घ
अनुभव लक्षात घेता त्यांनाच हे पद मिळावे, अशी अपेक्षा
त्यांच्या समर्थकांडून व्यक्त केली जात आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी
नुकताच दिल्ली दौरा केला. त्यांच्यासोबत संजय कुटे, जयकुमार रावल, चंद्रशेखर बावनकुळे,
श्रीकांत भारतीय यांच्यासह राम शिंदे यांचाही समावेश होता. यातील
काही नेत्यांची प्रदेशाध्यक्षपदासाठी चाचपणी सुरू असल्याचे सांगण्यात येत असतानाच
आता शिंदे यांचेही नाव पुढे आले आहे. शिंदे यांची बलस्थानेही सांगितली जाऊ लागली
आहेत. कर्जत-जामखेड मतदारसंघातून शिंदे आमदार होते. युतीच्या सरकारमध्ये ते मंत्री
झाले. तत्कालीन मुख्यमंत्री आणि आताचे विरोधी पक्ष नेते फडणवीस यांचे ते
निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळेच त्यांच्या मंत्रिमंडळात शिंदे यांच्याकडे तब्बल
चौदा खाती होती. त्या सरकारमध्ये सर्वांत जास्त खाती मिळालेले ते एकमेव मंत्री
होते.
राजशिष्टाचार खाते मुख्यमंत्र्यांऐवजी पहिल्यांदाच शिंदे यांना देण्यात आले
होते. नव्याने स्थापन करण्यात आलेले ओबीसी मंत्रालय तसेच फडणवीस यांचा
महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवाय प्रकल्प ज्या खात्यांतर्गत होता ते जलसंधारण खातेही
शिंदे यांच्याकडे होते. माजी प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार, देवेंद्र फडणवीस, चंद्रकात पाटील यांच्यासोबत शिंदे यांनीही पक्ष संघटनेत अनेक पदांवर काम केले आहे. अशी
अनेक बलस्थाने असल्याने शिंदे यांचाही या पदासाठी विचार होऊ शकतो, असे त्यांच्या समर्थकांना वाटते.
राष्ट्रवादीचे रोहित पवार यांनी गेल्या निवडणुकीत
शिंदे यांचा पराभव केला. त्यानंतर शिंदे यांचे पक्षाकडून पुनर्वसन केले जाईल, अशी अपेक्षा समर्थकांना होती. अलीकडेच
त्यांना पक्ष संघटनेत पहिल्यापेक्षा मोठी जबाबदारी देण्यात आली होती. मात्र,
आता प्रदेशाध्यक्षच बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्याने थेट या
पदासाठीच त्यांच्या समर्थकांकडून दावा सांगितला जाऊ लागला आहे. विशेष म्हणजे
पूर्वी या पदासाठी त्यांच्या नावाची चर्चा झाली होती. मात्र, त्यांना हे पद मिळाले नव्हते. आता ओबीसी चेहरा देण्याची पक्षाची भूमिका
असल्याने शिंदे यांचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्षपदावरून चंद्रकांत पाटील यांना हटवून नव्या दमाचं
नेतृत्व देण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यात आशिष शेलार आणि चंद्रेशेखर बावनकुळे यांची नावे
आधीपासूनच चर्चेत आहेत.
0 टिप्पण्या