Ticker

6/Breaking/ticker-posts

दारुच्या नशेत पत्नीचा खून करून स्वतः केली आत्महत्या ;शेवगाव तालुक्यातील खरडगाव येथे खळबळ



लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)













शेवगाव :-दारुच्या नशेत केलेल्या मारहाणीत पत्नीचा खून झाल्याचे लक्षात आल्यानंतर पतीने पश्चाताप म्हणुन लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शेवगाव तालुक्यातील खरडगाव येथे शुक्रवारी उघडकीस आली. या घटनेने नगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या दुर्दैवी घटनेतील मयत पती-पत्नीची नावे अनुक्रमे लताबाई दशरथ दळे (वय ४५) व दशरथ मन्सीराम दळे (वय ५०) अशी आहेत.

    याबाबत मयताच्या मुलाने पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून पत्नीचा खून केल्याचा गुन्हा मयत दशरथ दळे याचेविरुद्ध दाखल करण्यात आला आहे. मारहाणीत पत्नीची हत्या झाल्याचे निदर्शनास येताच आरोपी दशरथ दळे याने झाडाला गळफास घेऊन जीवन यात्रा संपवली. यासंदर्भात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

         याबाबत मयताचा मुलगा नवनाथ दशरथ दळे (वय २३) याने फिर्यादीत म्हटले आहे की, मी शेवगाव तालुक्यातील खरडगाव येथे कुटूंबासह राहतो व मजुरीकाम करुन माझ्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करतो. माझी आई लताबाई (वय ४५) व वडील दशरथ मन्सीराम दळे (वय ५०) हे आमच्या घरासमोरच झोपडीत राहतात. माझा लहान भाऊ संदीप दशरथ दळे याचे लग्न झालेले असल्याने तो त्याचे कुटंबासह माझ्याच घरात दुसर्‍या खोलीत राहतो. माझी लहान बहिण रोहिणी हिचे लग्न झालेले असून ती चिखलठाण येथे सासरी राहत़े. माझे वडील दशरथ हे नेहमी दारु पित असत व त्यामुळे ते बर्‍याच वेळा दारुचे नशेत आईसोबत तसेच आमचे सोबत भांडण करुन शिवीगाळ करीत असत.
      दिं. १९ ऑगस्ट २०२१ रोजी रात्री आम्ही नेहमीप्रमाणे जेवण करुन घरात असताना अंदाजे ११ वाजेदरम्यान आई-वडीलांचे झोपडीत आपापसात भांडण सुरु होते. त्यावेळी बाहेर पाऊस सुरु असल्याने व त्यांचे नेहमीचेच भांडण असल्याने आम्ही त्यांचेकडे दुर्लक्ष केले व झोपी गेलो.

         दुसर्‍या दिवशी दिं.२० ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास मी झोपेतुन उठलो. त्यावेळी माझा लहान भाऊ संदीप याने मला फोन करुन सांगितले की, तात्याने (वडीलाने)आपले घरापासून जवळच असलेल्या झाडाला दोराने गळफास घेतला आहे. त्यावेळी मी तेथे जाऊन खात्री केली असता माझे वडील दशरथ दळे हे झाडाला दोरीचे सहाय्याने गळफास घेऊन लटकलेले दिसले. त्यावेळी मी व भाऊ असे आम्ही घरी आईला उठवायला झोपडीत गेलो असता आई काही एक हालचाल करत नव्हती. तिचे डोक्याला मार लागुन डोक्यातुन व नाकातुन रक्त येत होते. तेथे बाजुलाच लाकडी दांडा पडलेला होता. त्याला एका बाजुने रक्त लागलेले होते.

           सदर घटनेबद्दल गावातील लोकांना माहिती झाल्यावर काही वेळाने पोलीस आल्यावर गावातील लोकांचे मदतीने आम्ही आई-वडीलांना अ‍ॅम्ब्युलन्समध्ये टाकुन शेवगाव ग्रामीण रुग्णालय येथे आणले.

या घटनेवरून आमची खात्री झाली की, माझ्या वडीलांनीच रात्रीचे वेळी दारुच्या नशेत आईला दांडक्याने डोक्यात मारहाण करुन जिवे ठार केले. त्यानंतर पश्चातापात होऊन वडील दशरथ दळे यांनी स्वतः आमचे घराचे जवळच असणारे झाडाला दोराने गळफास घेवुन आत्महत्या केली.

           आपल्या वडिलांनी दारुच्या नशेत आईच्या डोक्यात लाकडी दांडक्याने मारहाण करून खून केला आहे. या फिर्यादीवरून शेवगाव पोलिस ठाण्यात मयत दशरथ दळे याचेवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर, आपल्याकडून दारुच्या नशेत पत्नीचा खून झाल्याचे समजल्यावर दशरथ दळे याने घराजवळच असणार्‍या लिंबाच्या झाडाला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. यामुळे शेवगाव पोलिस ठाण्यात हत्या व आकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित ठाकरे करत आहेत.

    दरम्यान, खरडगाव येथे देशी दारूची अवैध विक्री मोठ्या प्रमाणावर सुरू असून ती बंद करण्यात यावी, अशी ग्रामस्थांची अनेक दिवसाची मागणी आहे. मात्र, या मागणीकडे राज्य उत्पादन शुल्क व पोलीस खात्याचे सपशेल दुर्लक्ष असल्याचा आरोप ग्रामस्थांनी लोकनेता प्रतिनिधीशी बोलताना केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या