Ticker

6/Breaking/ticker-posts

'आमची ईडी तर लागली, आता...तुमची सीडी लावाच..'; गिरीश महाजनांचं खडसेंना खुलं आव्हान

 







लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

जळगाव: गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेली ईडी आणि सीडी बाबतची चर्चा आता जुनी झाली आहे. मात्र, आता ईडी लागली असल्याने त्यांनी आता सीडी दाखवावी, असे आव्हान माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंना दिले आहे.

जळगाव जिल्ह्यातील भाजप नेते गिरीश महाजन व राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यात मागील वर्षापासून ईडी व सीडी वरून जुगलबंदी सुरू आहे. काल एकनाथ खडसे यांनी माझी ईडीची चौकशी सुरू आहे त्यामुळे मी म्हटल्यानुसार योग्य वेळ आल्यावर सीडी लावणार असल्याचे वक्तव्य केले होते. त्याच अनुषंगाने आज भाजप नेते गिरीश महाजन यांनी खडसेंवर पलटवार केला आहे. आज जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीनंतर गिरीश महाजन यांनी पत्रकारांशी संवाद साधला.


यावेळी बोलताना गिरीश महाजन म्हणाले की, ईडी अन् सीडीचा विषय आता बोअर झाला आहे, आमची ईडी तर चालली आहे, तुमची सीडी तर दाखवा. सीडी बाहेर येईल का नाही ते नेत्यांनाच विचारा? ते म्हणताहेत चौकशी करताहेत, तपासताहेत त्यामुळे आता समजेल योग्य वेळ कोणाची येते ते? अशा शब्दांत महाजन यांनी खडसेंचे नाव न घेता टोला लगावला. .

तर मंदिरे आम्ही उघडणार

करोना संसर्गाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. त्यामुळे आता अनेक निर्बंध शिथील झाले आहेत. राजकीय कार्यक्रम मोठ्या संख्येने होत आहेत, तसेच इतर राज्यांमध्ये देखील मंदिरे उघडली गेली आहेत. मात्र राज्य शासनाकडून अजूनही मंदिरे उघडण्याबाबत कोणताही निर्णय घेतला जात नसल्याने आज भाजप कडून मंदिरे उघडण्यासाठी आंदोलन करून राज्य शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. राज्य शासनाने आता मंदिरे उघडली नाहीत तर आम्ही ती मंदिरे उघडू, असा इशारा गिरीश महाजन यांनी दिला आहे.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या