Ticker

6/Breaking/ticker-posts

तहसीलदाराच्या एका चुकीमुळं आंदोलन चिघळलं ;नगर जिल्ह्यात मोठा राडा, पोलीसही हतबल

 

नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात मोठा राडा

आंदोलकांनी तोडलं तहसीलदार कार्यालयाचं गेट







लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

अकोले: सोमवारी सर्वत्र आदिवासी दिन साजरा केला जात असताना अकोले तालुक्यात मात्र आदिवासी व श्रमिकांनी आक्रमक आंदोलन केले. रेशन, रोजगार, शिक्षण व वेतनाच्या मूलभूत मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. मात्र, तहसीलदार कार्यालयात नसल्याने आक्रमक आंदोलकांनी तहसीलदार कार्यालयाचे गेट आणि पोलिसांचे कडे तोडून थेट कक्षात जाऊन ठिय्या दिला. अधिकारी आल्याशिवाय येथून हटणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.


आपल्या विविध मागण्यांसाठी अकोले तहसील कार्यालयासमोर आदिवासी, कामगार, कर्मचारी, निराधार व शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी दोनशे श्रमिकांनी आंदोलन सुरू केले. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व जनसंघटनांनी आदिवासी व श्रमिकांच्या मूलभूत प्रश्नावर आक्रमक भूमिका घेतली आहे. मात्र, याकडे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले. आंदोलन सुरू असताना तहसीदार एका खासगी कार्यक्रमाला निघून गेल्याचा आरोप आंदोलकांनी केला. त्यामुळे शांततेत सुरू असलेले आंदोलन चिघळले. त्यांनी तहसीलदारांच्या कक्षाकडे धाव घेतली. आंदोलकांनी तहसील कार्यालयाचे गेट तोडून आत प्रवेश केला. पोलिसांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना न जुमानता आंदोलक थेट कक्षात शिरले. तेथे जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. अधिकारी येईपर्यंत बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. या मागण्यांची प्रशासनाने तड न लावल्यास ११ ऑगस्टला पुन्हा मोर्चा काढून तहसील कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशाराही देण्यात आला.

 

यावेळी बोलताना डॉ. अजित नवले म्हणाले, आदिवासी दिनाच्या निमित्ताने आदिवासींच्या भावनांशी खेळायचे आणि नंतर आदिवासींच्या मूलभूत प्रश्नांकडे अक्षम्य दुर्लक्ष करायचे अशी संतापजनक परिस्थिती सध्या तालुक्यात दिसते आहे. रेशनचा काळाबाजार करून आदिवासींच्या अन्नात माती कालवायची, आदिवासींना जंगलच्या जमिनीवर अधिकार नाकारायचे, बांधकाम कामगार, अर्धवेळ परिचर, आशा कर्मचारी, घरेलू कामगार, अंगणवाडी कर्मचारी, विधवा, परित्यक्ता व निराधार वृद्धांना शासकीय योजना, वेतन व सामाजिक सुरक्षेपासून वंचित ठेवायचे. शासन व प्रशासनाचे हे अन्यायकारक उद्योग मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष सहन करणार नाही.


या आंदोलनात सदाशिव साबळे, नामदेव भांगरे, एकनाथ मेंगाळ, जुबेदा मणियार, आराधना बोऱ्हाडे, प्रतिभा कुलकर्णी, संगीता साळवे, तुळशीराम कातोरे, भरती गायकवाड, सविता काळे, राजाराम गंभीरे, प्रकाश साबळे, अविनाश धुमाळ, संदीप शिंदे, खंडू वाकचौरे, मथुराबाई बर्डे, नंदू गवांदे, साहेबराव घोडे, भाऊसाहेब मेंगाळ यांच्या नेतृत्वाखाली शेकडो आदिवासी व श्रमिक सहभागी झाले होते.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या