Ticker

6/Breaking/ticker-posts

होय.., आम्ही बाळासाहेबांचे कडवट शिवसैनिक !; नितेश राणे थेटच बोलले

 






लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

मुंबई: 'होय आम्ही बाळासाहेबांचे कडवट शिवसैनिक आहोत. मरेपर्यंत आम्ही शिवसैनिकच राहणार आहोत पण तुमचं काय? तुम्ही खरे शिवसैनिक आहात का?', अशा शब्दांत भाजप आमदार आणि नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांना लक्ष्य केलं आहे.


संजय राऊत यांनी नगरमधील एका कार्यक्रमात नारायण राणे यांच्या आक्रमकतेवर भाष्य करताना टोलेबाजी केली. ' शिवसेनेतून कुणीही दुसऱ्या पक्षात गेलं तरी त्याची शिवसैनिक ही मूळ ओळख कायम राहते. हा नारायण राणे, तो अमूक, तो तमूक असं कुणी म्हणत नाही. त्याला शिवसैनिक म्हणूनच ओळखलं जातं. आमदार खासदार माजी होतात पण शिवसैनिक कधीच माजी होत नाही', अशाप्रकारचे विधान राऊत यांनी केले होते. त्यावर नितेश राणे यांची प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी राऊत यांना उलट सवाल केला.


' राणे शिवसैनिक आहेत' या संजय राऊत यांच्या मताशी मी सहमत आहे. हो आम्ही शिवसैनिकच आहोत आणि मरेपर्यंत आम्ही शिवसैनिकच राहणार आहोत. त्याचा आम्हाला अभिमानही आहे पण संजय राऊतांचं काय? ते शिवसैनिक आहेत की शरद पवारांचे सैनिक आहेत हे त्यांनीच सांगावं. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक आहोत अशी ओळख जाहीरपणे सांगतोय पण ते तसं सांगू शकणार नाहीत. कारण ते शिवसेनेचं नाही तर पवारांच्या राष्ट्रवादीचं काम करत आहेत', अशा शब्दांत नितेश राणे यांनी निशाणा साधला.

शिवसेना भवन आता वसुलीभवन झालंय !

बाळासाहेबांचं शिवसेना भवन आता राहिलं नाही. शिवसेना भवन आता वसुली भवन झालं आहे, अशी टीका यावेळी नितेश राणे यांनी केली. शिवसेना भवनापासून जवळच भाजप कार्यालयाचं उद्घाटन नितेश यांच्या हस्ते झालं. त्यानंतर ते बोलत होते. काही दिवसांपूर्वीच शिवसेना भवन जवळ भाजप कार्यकर्ते आणि शिवसैनिकांमध्ये राडा झाला होता. त्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. तणाव टाळण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या अनुषंगाने प्रश्न विचारला असता, डिवचणं वगैरे सोडा इथे कुणी आज फिरकलंच नाही. खरंतर मी फार अपेक्षेने आलो होतो. शिवसैनिक माझ्या स्वागताला येतील असे वाटले होते पण तसं काहीच झालं नाही, असे नमूद करत नितेश यांनी टोलेबाजी केली. मुंबईच्या प्रॉपर्टी कार्डवर काही शिवसेनेचे नाव लिहिलेले नाही. मुंबई आमचीपण आहे. त्यामुळे शिवसेना भवनसमोर कार्यालय उघडलं तर बिघडलं कुठे असा सवालही त्यांनी केला. हा शिवसेनेचा बालेकिल्ला वगैरे काही नाही म्हणत नितेश यांनी असुविधांवर बोट ठेवलं आणि नागरिकांचे प्रश्न सोडवून आम्ही येथे आमचा बालेकिल्ला तयार करू असे सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या