आठवड्यातून एकदा हजेरी लावण्याचे आदेश
२५ हजार रुपयांच्या बॉण्डवर कोर्टाने दिला जामीन
लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
नाशिक: न्यायालयीन कोठडीमुळे सेंट्रल जेलमध्ये
असलेल्या माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर-वीर यांना अखेर जिल्हा कोर्टाने
अटीशर्थींसह जामीन मंजूर केला. सुनावणीवेळी झनकर प्रत्यक्ष कोर्टात हजर नसल्याने
त्यांच्या सुटकेची प्रक्रिया सांयकाळी उशिरापर्यंत सुरू होती. २५ हजार रुपयांचा
बॉण्ड आणि आठवड्यातून एक दिवस एसीबी कार्यालयात हजेरीची अटीवर कोर्टाने जामीन मंजूर केला.
सरकारी पक्षातर्फे अॅड. सचिन धोरवडकर यांनी जामीन अर्जास जोरदार विरोध दर्शवला. युक्तिवाद करताना सुप्रीम कोर्टातील तीन खटल्याचा आधार दिला. जामीन अर्जास मंजुरी मिळाली तर तपासासवर परिणाम होणे, पुराव्यांची छेडछाड, अधिकारपदाचा गैरवापर करून साक्षीदारांवर दबाव टाकला जाण्याची भीती सरकारी पक्षाने व्यक्त केली.
बचावपक्षातर्फे अॅड. अविनाश भीडे यांनी युक्तिवाद करताना हे मुद्दे खोडून काढले. सुप्रीम कोर्टातील खटल्यांचा दिला गेलेला संदर्भ प्रत्येक घटनेनुसार वेगळा आहे. त्याचा थेट संबंध या जामीन अर्जाशी नसल्याचे स्पष्ट करीत कोर्टाने जामीन मंजूर करण्याची विनंती केली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर कोर्टाने झनकर यांना जामीन मंजूर केला.
२५ हजार रुपयांचा बॉण्ड आणि एसीबी कार्यालयात आठवड्यातून एकदा हजेरी लावण्याची अट झनकर यांना घालण्यात आली. दरम्यान, सोमवारच्या सुनावणीसाठी झनकर यांना कोर्टात हजर करण्यात आलेले नव्हते. त्यामुळे जामिनावरील सुनावणीनंतर कोर्टाचे रिलीज ऑर्डर सेंट्रल जेलमध्ये पाठवण्यात आले. झनकर यांच्या सुटकेवर संध्याकाळी उशिरापर्यंत कार्यवाही सुरू होती.
0 टिप्पण्या