Ticker

6/Breaking/ticker-posts

शासकीय कार्यालयातच ओली पार्टी ; व्हायरल व्हिडीओने खळबळ

 






लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

जळगाव: जळगावातील एका शासकीय कार्यालयातील एका दालनातच टेबलावर मद्याची बाटली, ग्लॅस व सोबत चकणा ठेवून काही अधिकारी व कर्मचाऱ्यंनी ओली पार्टी रंगविल्याचा एक व्हिडीओ आज गुरुवारी सांयकाळी व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. जळगावातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे नुकतेच उद्घाटन झालेले हे कार्यालय असल्याचे व्हिडीओतून समोर येत आहे. याप्रकरणी प्राधिकरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कानावर हात ठेवले असले तरी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी असे काही असेल तर याप्रकरणाची चौकशी करण्यात येईल असे त्यानी सांगीतले.

जळगाव जिल्ह्यात एका गुन्ह्यातील संशयित व नेत्यासोबत पोलिसांनी ठेका धरल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याची घटना झाली होती. त्यापाठोपाठ आज गुरुवारी शासकीय कार्यालयातील दालनात असलेल्या टेबलावर मद्याची बाटली, सोडा, चखणा असा साज करुन काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेल्या पार्टीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. जळगाव शहरातील आकाशवाणी चौकात असलेल्या प्रशासकीय इमारतीमधील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयातील हा प्रकार असल्याचे व्हायरल व्हिडीओमधून निष्पन्न होत आहे.

 विशेष म्हणजे या कार्यालयात नुकतेच पालकमंत्री गुलाबराव पाटील, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे सचिव किशोर राजेनिंबाळकर यांच्या उपस्थितीत धुळे, नंदुरबार आणि जळगाव अशा तीनही जिल्ह्यांचे एकत्रित कार्यालय सुरू करण्यात आले आहे. हा व्हिडीओ आज सायंकाळी व्हायरल झाला असला तरी तो काल बुधवारचा असल्याची माहीती मिळाली आहे.

काय आहे व्हिडीओमध्ये ?

या व्हिडीओमध्ये सुरुवातीलाच शासकीय कार्यालयाच्या इमारतीच्या समोरचा भाग दिसत आहे. त्यात लावलेल्या शासकीय फलकावर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण संकुल, अधिक्षक अभियंता जळगाव मंडळ, जळगाव असे लिहलेले आहे. त्यानतंर कार्यालयाचा चित्रण करण्यात आले आहे. त्यातील फाईली सर्व स्पष्ट दिसत आहे. त्यापुढील एका दालनात टेबलावर तिन जण बसलेले आहेत. टेबलावर मद्याची बाटली, सोड्याच्या व पाण्याच्या बाटल्या सोबतच खाण्याचे पदार्थ प्लेटमध्ये दिसत आहे. विशेष म्हणजे पार्टी करणाऱ्यांमधील एकाचे चित्रण करणाऱ्याकडे लक्ष गेल्याने का रे, भो !असे म्हणत ती व्यक्ती उठून बाहेर येत असल्याचे दिसत आहे.

चौकशी करणार - कार्यकारी अभियंता

या घटनेसंदर्भात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे कार्यकारी अभियंता निकम यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या घटनेबाबत आपल्याला माहिती मिळाली आहे. घडलेल्या प्रकाराची चौकशी केली जाईल. जर असा प्रकार घडला असेल तर संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल, असे निकम यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या