आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नांतून जामखेड शहराला मिळणार नवी ओळख
लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
जामखेड, . : कर्जत- जामखेडचे लोकप्रिय आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नांतून जामखेड येथे भव्य असे अत्याधुनिक सोईसुविधांनी सुसज्ज बस स्थानक उभारले जात असून नागरिकांच्या सोईसाठी व्यापारी संकुलाचीही निर्मिती करण्यात येत आहे. मतदारसंघाच्या विकासासाठी आणि नागरिकांना अद्ययावत सुविधा प्राप्त करून देण्यासाठी आमदार रोहित पवार विविध विकासकामांच्या माध्यमातून नवे आयाम देत आहेत. मंगळवार दिनांक ३ ऑगस्ट रोजी जामखेड येथील बहुप्रतिक्षित बस स्थानक आणि व्यापारी संकुलाचे भूमी पूजन आमदार रोहित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
नागरिकांना मिळणाऱ्या सार्वजनिक सुविधा या अनुषंगाने त्या-त्या भागातील विकासाची परिभाषा ठरवली जाते. लोकांना मिळणाऱ्या सोई सुविधा, त्या सर्व सेवांचा होणारा विनियोग याद्वारे संबंधित भागातील लोकप्रतिनिधींच्या कार्यकाळाची मीमांसा केली जाते. मागील सरकारच्या काळात तत्कालीन लोकप्रतिनिधींनी अनेक वेळा आश्वासने दिली होती, मोठ्या घोषणा केल्या होत्या, मात्र आपल्या १० वर्षाच्या कार्यकाळात, त्यातही ५ वर्ष मंत्रीपद असतानाही जामखेडच्या प्रलंबित बस स्थानकाचा प्रश्न मार्गी लावण्यात त्यांना अपयश आले. असा आरोप आ.पवार यांनी केला.
आमदार रोहित पवार यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघात आपल्या कार्यकर्तृत्वाचा नवा पायंडा स्थापित करून विकासकामांचा धडाका लावला आहे. आपल्या आमदारकीच्या कार्यकाळात सुरू केलेल्या विकासाच्या निर्णायक कृतिकार्यक्रमांमुळे मतदारसंघातील नागरिकांना नवी दृष्टी दिली आहे. आमदार रोहित पवार यांनी लोकांच्या सेवेसाठी सातत्याने प्रयत्नशील राहून राजकीय इच्छाशक्ती आणि कृतीशील आचरणातून राज्यभरातील लोकप्रतिनिधींसमोर नवा आदर्श स्थापित करण्याचे काम केले आहे.
मतदारसंघाचा कायापालट करण्याच्या दृष्टीने जामखेड शहरातील बस स्थानक कात टाकत आहे. आमदार रोहित पवार यांनी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांतून जुन्या बस स्थानकाच्या जागी दहा प्लॅटफॉर्म असलेले भव्य असे सर्वसुविधा संपन्न बस स्थानक उभारले जाणार आहे. यामध्ये महिला आणि पुरुष प्रवाशांसाठी आधुनिक पद्धतीच्या स्वछतागृहांची व्यवस्था करण्यात येणार आहे. लोकांना ये-जा करण्यास सुलभता मिळावी यासाठी क्रश हॉलची निर्मिती करण्यात येणार आहे. दूरवरून येऊन बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्यांचे वाहन पार्किंगसाठी वाहनतळाची व्यवस्था येथे असणार आहे.
महिला आणि पुरुष प्रवाशांच्या विश्रांतीसाठी वेगवेगळ्या विश्राम कक्षाची सुविधा उपलब्ध होणार आहे. हिरकणी कक्ष, महिला वाहक आणि चालक, पुरुष वाहक आणि चालक यांच्यासाठी वेगळे कक्ष निर्माण केले जाणार आहेत. आजूबाजूच्या खेडेगावातून लोक आपल्या दैनंदिन व्यवहारासाठी नियमितपणे ये-जा करत असतात, खरेदी- विक्रीचे हे प्रमुख ठिकाण आहे, येथे सुसज्ज बस स्थानक नसल्याने लोकांची गैरसोय होत होती ती आता दूर होणार आहे. शिक्षणासाठी ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्या विद्यार्थ्यांची समस्या यामुळे दूर होऊन बस उपलब्ध होतील. तसेच नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना आपल्या दैनंदिन व्यवहारात उत्तम सुविधा मिळाव्यात यासाठी बस स्थानकासह ३४ दुकाने असलेल्या सुनियोजित अशा भव्य व्यापारी संकुलाचे निर्माण कार्य येथे करण्यात येणार असून येथील व्यवसायांना व नवं उद्योजकांना चालना मिळणार आहे.
कर्जत शहरातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला बस डेपोचा प्रश्न आमदार रोहित पवार यांनी मार्गी लावला. सध्या बस डेपो निर्माण कार्य सुरु झालेले आहे. प्रगतीपथावर असलेले बस डेपोचे हे काम लवकरच पूर्ण होऊन नागरिकांच्या सेवेसाठी सज्ज होईल.
*"जामखेड शहरातून प्रवास करताना लोकांना चांगल्या दर्जाच्या सुविधा, अत्यावश्यक सोई व आवश्यक गरजेच्या वस्तू स्थानक परिसरात उपलब्ध होणार आहेत. यामुळे जामखेडला राज्यातील एक अत्याधुनिक बस स्थानक म्हणून नावलौकिक प्राप्त होईल. महाविकास आघाडी सरकार, राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार आणि परिवहनमंत्री मा. अनिलजी परब साहेब यांनी केलेल्या सहकार्यामुळे आज हे काम सुरू होत आहे याचा मला आनंद होतोय."
रोहित पवार (आमदार, कर्जत-जामखेड)
0 टिप्पण्या