लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
शिर्डी : ‘अनेकदा आंदोलने करूनही जर महाविकास आघाडीचे सरकार मंदिरे उघडण्याचा निर्णय
घेत नसेल तर आम्हाला यासाठी न्यायालयात जावे लागेल. मुख्यमंत्री स्वत: घरात बसले
अन् देवांनाही डांबून ठेवले. अजून किती दिवस कायद्याचा धाक दाखवून तुम्ही
भाविकांना वेठीस धरणार,’ असा सवाल भाजप नेते राधाकृष्ण विखे
पाटील यांनी केला.
भारतीय जनता पक्षाच्या अध्यात्मिक
आघाडीच्या वतीने राज्यातील मंदिरे खुली करावीत या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले.
नगर जिल्ह्यात श्रीक्षेत्र कोल्हार येथील भगवती माता मंदिराच्या प्रांगणात
आयोजित करण्यात आलेल्या शंखनाद आंदोलनात विखे पाटील सहभागी झाले होते. त्यावेळी
त्यांनी राज्य सरकारवर टीका केली.
विखे पाटील म्हणाले, ‘भाविक, वारकरी
आणि अध्यात्म क्षेत्रातील व्यक्तींच्या भावनांशी तुम्ही खेळू नका, यापूर्वी पंढरपूरच्या वारीवर बंधन घालून तुम्ही वारकऱ्यांचा अपमान
केलेलाच आहे. आता अधिक अंत पाहू नका अन्यथा या भावनांचा उद्रेक होईल. राज्यात
एकीकडे दारूची दुकानं सरकारने सुरू केली. लसीचे दोन डोस घेतलेल्या व्यक्तींना
तुम्ही मॉलमध्ये परवानगी दिली, मुंबईमधील लोकलही सुरू केल्या,
मग मंदिरांबाबतच एवढी उदासिनता का? या सरकारच्या
विरोधात सर्वच समाज घटकांना रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागत आहे. अध्यात्मिक
क्षेत्रही आता बाजूला राहीलेली नाहीत. मंदिरांची दारं उघडावीत म्हणून दीड
वर्षापासून सर्वांची मागणी आहे, पण या बहिऱ्या, मुक्या, आंधळ्या महाविकास आघाडी सरकारला कोणत्याही
भावना राहिलेल्या नाहीत. आधिवेशन आलं की, राज्यातील करोना
वाढतो, सण, उत्सव आले की, या सरकारला लॉकडाउनची आठवण होते. शाळा सुरू करण्यासाठीही सरकार 'तारीख पे तारीख' जाहीर करते. हे सरकार संपूर्णपणे
गोंधळलेले आहे. या सरकारने घेतलेले निर्णय शेवटपर्यंत टिकत नाहीत, मंदिरं बंद ठेवली मग मंत्र्यांचे दौरे थांबलेत का? किती
दिवस कायद्याचा धाक दाखवून तुम्ही भाविकांना वेठीस धरणार,’ असा
सवालही त्यांनी उपस्थित केला.
आंदोलनात सहभागी
झालेल्या भजनी मंडळींनी उद्धवा अजब तुझे सरकार... हे गाणे सादर केले. त्यातून
वारकरी, व्यवसायिक यांच्यापुढे निर्माण झालेल्या व्यथा
भजनाच्या माध्यमातून मांडल्या. माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील,
डॉ. भास्करराव खर्डे, सभापती सौ. नंदाताई
तांबे, पंचायत समिती सदस्य बबलू म्हस्के, अशोक आसावा, उपसरपंच सविता खर्डे, संचालक स्वप्नील निबे, ह.भ.प नवनाथ महाराज म्हस्के,
भारत महाराज धावणे, संभाजीराव देवकर, उदय खर्डे, भाऊसाहेब घोलप, शिवाजीराव
घोलप, आण्णासाहेब बेंद्रे, विजय तांबे
यांच्यासह अध्यात्मिक क्षेत्रातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
0 टिप्पण्या