Ticker

6/Breaking/ticker-posts

पैशांचा पाऊस पाडणारी 'ती' टोळी अखेर पोलिसांच्या जाळ्यात

 







लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)


श्रीगोंदा : तालुक्यात पैशाचा पाऊस पाडून, फुलांवर पैसे ठेवून ते दुप्पट करण्याचे आमिष दाखवून फसवणूक झाल्याच्या चर्चा अधूनमधून सुरू असतात. अनेक व्यापारी, व्यावसायिक आणि राजकीय मंडळीही याला बळी पडल्याचे सांगण्यात येते. तालुक्यातीलच नव्हे तर बाहेरच्या लोकांचीही या तालुक्यात बोलावून लूट झाल्याची उदाहरणे आहेत. आता मात्र अशी एक टोळी पकडण्यात श्रीगोंदा पोलिसांना यश आले आहे. पुणे जिल्ह्यातील या टोळीने श्रीगोंद्यात येऊन गुन्हे केले आहेत.

अशा घटना वारंवार घडत असल्या तरी फसले गेलेले शक्यतो पोलिसांकडे जाणे टाळतात. बदनामी नको म्हणून घटनेची वाच्यताही करीत नाहीत. करमाळा (जि. सोलापूर) येथील दत्तात्रय महादेव शेटे यांनी मात्र पुढे येऊन फिर्याद दिली. १४ ऑगस्टला पैसे दुप्पट करून देण्याच्या बहाण्याने त्यांना साडेचार लाख रुपयांना फसविण्यात आले. साधूच्या वेषातील दोघांना पैसे दुप्पट करून देतो, असे सांगत आपली फसवणूक केल्याची फिर्याद शेटे यांनी दिली होती. पोलिसांनी अनोखळी आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल केला.


या गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांना आरोपींबद्दल माहिती मिळाली. पुणे जिल्ह्यातील थेरऊ (ता. हवेली) येथील आरोपी असे गुन्हे करीत असल्याचे त्यांना समजले. ढिकले यांनी पोलिस पथक पाठवून आरोपी संतोष साहेबराव देवकर (वय ४५) व अशोक फकिरा चव्हाण (वय ४५ दोघे रा. जाधवस्ती, थेऊर, ता. हवेली जि. पुणे) यांना अटक केली. त्यांच्याकडे चौकशी केली असना त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. शेटे यांची फसवणूक केलेली रक्कम त्यांनी वाटून घेतली होती. संतोष देवकर याच्याकडून १ लाख ७० हजार तर चव्हाण याच्याकडून २ लाख, ५ हजार रुपये आणि गुन्ह्यात वापरलेले वाहन जप्त करण्यात आले. सहायक पोलिस निरीक्षक दिलीप तेजनकर, अंकुश ढवळे, पोलिस कर्मचारी गोकुळ इंगवले, प्रकाश मांडगे, किरण बोराडे, दादा टाके, अमोल कोतकर, प्रशांत राठोड यांच्या पथकाने ही कारवाई केली. पुढील तपास फौजदार रणजित गट करीत आहेत.

अशी केली फसवणूक

पोलिसांनी अधिक तपास सुरू केला असता या आरोपींविरूदध पुणे जिल्ह्यात जुन्नर पोलिस स्टेशनलाही गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळाली. पोलिस निरीक्षक ढिकले यांनी सांगितले, ‘हे आरोपी लोकांना औषधी वनस्पती, रुद्राक्ष विक्री करण्याचा व भिक्षा मागण्याचा बहाणा करुन विश्वास संपादन करतात. त्यातून जवळीक साधत विश्वास संपादन झाल्यानंतर लोकांची माहिती काढण्यास सुरवात करतात. आर्थिक अडचण असणारे, कर्जबाजारी असलेले यांच्याबद्दल संभाषणातून माहिती मिळवितात. त्यानंतर अशा लोकांना सावज करतात. त्यांना गाठून तुमचे पैसे आम्ही दुप्पट करुन देतो, असे आमिष दाखवितात. पैशाची गरज असलेले लोक त्यांच्यावर विश्वास ठेवतात. त्यानंतर अशा लोकांना पैसे घेऊन निर्जन ठिकाणी रात्रीच्या वेळी बोलाविले जाते. तेथे त्यांनी आणलेले पैसे फुलांवर ठेवतात. त्या व्यक्तीच्या हातात तांदूळ देतात. डोळे मिटून प्रदक्षिणा घालायला सांगतात.

या दरम्यान, त्या व्यक्तीची नजर चुकवून फुलांवरील पैसे काढून घेतात. फुले एका पिशवीत ठेवून ती त्या व्यक्तीच्या हातात देतात. ती गाडीच्या डिक्कीत ठेवून घरी जा आणि सकाळी उघडून पहा, असे सांगतात. मध्येच उघडली तर नुकसान होईल, असेही बजावतात. त्यांच्यावर विश्वास ठेवणारे फसतात. फसवणूक झाल्याचे त्यांच्या थेट दुसऱ्या दिवशी लक्षात येते. तोपर्यंत आरोपी पैसे घेऊन पसार झालेले असतात. अशी आरोपींच्या फसवणुकीची पद्धत आहे. कधी पैशाचा पाऊस पाडण्याची बतावणी करून घरी पुजा करायला लावतात, तेथेही अशीच हातचलाखी करून पैसे घेऊन पळून जातात. अशा प्रकारांना नागरिकांनी बळी पडू नये. असा प्रकार कोठे होत असल्याचे माहिती मिळाली तर पोलिसांना कळावावे’, असेही ढिकले यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या