Ticker

6/Breaking/ticker-posts

९ ऑगस्ट १९४२ :ब्रिटिश सत्तेवर निर्णायक शेवटचा प्रहार..!

 






लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

जपासून बरोबर 80 वर्षापूर्वी 9 ऑगस्ट 1942 रोजी मध्यरात्रीपासून मुंबईत आणि देशात पोलिसांच्या धाडी सुरु झाल्या आणि पहाटेपर्यंत गांधी, नेहरु, पटेल, मौलाना आझाद यांच्या बरोबरच अनेक नेत्यांना अटक करण्यात आली.गांधींजींनी  लागोलाग पुण्याच्या आगाखान पॅलेसमध्ये हलवण्यात आलं तर इतर नेत्यांना अहमदनगरच्या किल्ल्यातील तुरुंगात धाडण्यात आलं. 9  ऑगस्ट असं काय होणार होतं की ज्याची ब्रिटिशांनी एवढी धास्ती घेतली. उत्तर सोपं होतं, ते म्हणजे ऑगस्ट क्रांती दिन आणि 'भारत छोडो आंदोलन'.

" मी आपल्याला एक मंत्र देणार आहे, त्याला आपल्या हृदयामध्ये कोरुन ठेवा. तुमच्या प्रत्येक श्वासासोबत या मंत्राचा आवाज यायला हवा. हा मंत्र आहे 'करो या मरो'. आपण भारताला स्वातंत्र्य तरी करुयात किंवा या प्रयत्नामध्ये आपले बलिदान देऊया." हा मंत्र गांधींजींनी  देशवासियांना दिला आणि प्रत्येक भारतीयामध्ये चेतना संचारली, ब्रिटिश सत्तेवर शेवटचा आघात सुरु झाला. 

गांधींजींनी 8 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईच्या गवालिया टॅंक मैदानावर 'भारत छोडो' आंदोलनाची घोषणा केली आणि 9 ऑगस्टला क्रांती दिन' पाळायचं ठरलं. हाच दिवस भारताच्या स्वातंत्र्याच्या इतिहासातील क्रांती दिवस म्हणून ओळखला जातो. आजपासून 80 वर्षापूर्वी झालेल्या 'ऑगस्ट क्रांती दिना'ने भारतातील ब्रिटिशांच्या सत्तेला सुरुंग लावला आणि पुढे 15 ऑगस्ट 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळालं. 



'ऑगस्ट क्रांती' काय होती? या क्रांतीचं महत्व काय
ब्रिटिशांच्या सुमारे दीडशे वर्षांच्या गुलामीच्या बेड्या तोडण्यासाठी प्रत्येक भारतीय आतुर होता. त्याच वेळी 'करो या मरो' या मंत्रासह महात्मा गांधींनी या आंदोलनाची ठिणगी पेटवली. आयुष्यभर अहिंसेवर श्रद्धा असणाऱ्या गांधींनीच 'करो या मरो' हा मंत्र दिल्याने प्रत्येक भारतीयामध्ये एक उत्साह संचारला होता. कोट्यवधी भारतीय त्यांच्या या आव्हानाला प्रतिसाद देत रस्त्यावर उतरले. ऑगस्ट क्रांती हे असं व्यापक जनआंदोलन होतं ज्याने ब्रिटिशांच्या सत्तेला हादरा दिला

 भारत छोडो आंदोलनाची पार्श्वभूमी

भारत छोडो आंदोलनाची पार्श्वभूमी ही 1942 च्या आधीच्या स्वातंत्र्याशी जोडली गेली आहे. पण दुसऱ्या महायुद्धामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे या लढ्याला मोठं बळ मिळालं.  1939 साली  दुसऱ्या महायुद्धाची सुरुवात झाली आणि जग दोन गटात विभागलं गेलं. अमेरिका, ब्रिटनच्या नेतृत्वाखालील दोस्त राष्ट्र आणि जर्मनी, जपानच्या नेतृत्वाखालील अक्ष राष्ट्र. आग्नेय आशियात ब्रिटिशांचा जपानच्या सैन्याने पराभव केला आणि सिंगापूर, मलाया आणि बर्मा म्हणजे आजचे म्यानमार जिंकून भारताच्या सीमेपर्यंत मुसंडी मारली. आता जपान कधीही भारतावर हल्ला करणार अशी परिस्थिती निर्माण झाली होती. 

भारतातही ब्रिटिशांच्या विरोधात स्वातंत्र्याची लढाई सुरु होती. अशा परिस्थितीत दोस्त राष्ट्रांसाठी भारताचा पाठिंबा हा अत्यंत महत्वाचा होता. त्यामुळे अमेरिका आणि फ्रान्सने ब्रिटनवर दबाव टाकायला सुरुवात केली. भारतीय गव्हर्नर जनरल लॉर्ड लिनलिथगो यांनी भारतीय नेत्यांना न विचारता 3 सप्टेंबर 1939 साली भारत जर्मनीविरोधात या युद्धात सामिल होत असल्याची घोषणा केली. 

काँग्रेसमध्ये या युद्धात ब्रिटिशांना पाठिंबा देण्यावरुन मतभेद होते. ब्रिटनला कोणत्याही परिस्थितीत भारताची साथ आवश्यक होती. पण या युद्धानंतर भारताला काय मिळणार यावर ब्रिटिशांनी चर्चा करावी अशी भूमिका भारतीय नेत्यांनी घेतली होती. 

'क्रिप्स मिशन' भारतात

ब्रिटिशांनी  सर स्टॅफर्ड क्रिप्स यांच्या नेतृत्वाखाली मार्च 1942 साली 'क्रिप्स मिशन' भारतात पाठवलं. क्रिप्स मिशनने भारताला पूर्ण स्वराज्य नाकारुन डॉमिनियन स्टेटस देण्याचा प्रस्ताव मांडला. पण भारतीयांनी हा प्रस्ताव नाकारला. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी ब्रिटिशांकडून भारतीय स्त्रोतांचं शोषण करण्यात आलं, युद्धाच्या खर्चासाठी बंगाल प्रांतातल्या शेतकऱ्यांच्या जमिनी काढून घेण्यात आल्या होत्या, भारतीयांचे शोषण सुरु होतं. त्यामुळे लोकांमध्ये असंतोष उफाळून आला होता, साम्राज्यवादावर आता अंतिम प्रहार करण्याची वेळ आली होती. 

सुरुवातीला 'भारत छोडो' आंदोलन सुरु करायचे का नाही यावर अनेक वाद झाले. महात्मा गांधी या आंदोलनाच्या समर्थनार्थ होते तर जवाहरलाल नेहरू, राजगोपालाचारी, मौलाना आझाद आणि इतर डाव्या विचारांच्या नेत्यांना अशा परिस्थितीत आंदोलन करणं महत्वाचं वाटत नव्हतं. पण गांधींनी हे आंदोलन सुरु करायचंच असा निर्धार केला होता. 

वर्ध्यामध्ये 14 जुलै 1942 रोजी राष्ट्रीय काँग्रेसच्या कार्यकारणी समितीची बैठक झाली. त्यामध्ये 'भारत छोडो' चा प्रस्ताव मांडण्यात आला. त्यानंतर 1 ऑगस्ट 1942 रोजी अलाहाबादमध्ये टिळक दिवस साजरा करण्यात आला. 8  ऑगस्ट 1942 रोजी मुंबईच्या गवालिया टँक मैदानात राष्ट्रीय

काँग्रेसची बैठक झाली. या बैठकीत ऐतिहासिक 'भारत छोडो'चा प्रस्ताव पारित करण्यात आला. देशभरातील स्वातंत्र्यसैनिकांची एकच मागणी होती, ती म्हणजे 'पूर्ण स्वराज्य'. 

प्रमुख नेत्यांना अटक

गांधींच्या 'करो या मरो' या मंत्राने जनतेवर जादूई प्रभाव पाडला आणि त्यांच्यामध्ये एक नवा जोश, साहस, संकल्प, दृढनिश्चय, आत्मविश्वास संचारला. ऑगस्ट क्रांती आंदोलनाची घोषणा 8 ऑगस्ट रोजी झाली आणि 9 ऑगस्टच्या पहाटेपर्यंत काँग्रेसच्या सर्व प्रमुख नेत्यांना अटक करण्यात आली. काँग्रेसला असंवैधानिक संस्था घोषित करण्यात आली. 

भूमिगत आंदोलन आणि जनतेचे नेतृत्व

महत्वाचे नेते अटकेत होते आणि इतर नेते भूमिगत झाल्याने या आंदोलनाला तसं नेतृत्व राहीलं नाही. त्यामुळे लोकांनीच हे आंदोलन हाती घेतल्याने हे आंदोलन 'लिडरलेड मुव्हमेंट' ठरलं. जयप्रकाश नारायण, अच्युत पटवर्धन, राम मनोहर लोहिया, सुचेता कृपलानींसारख्या नेत्यांनी भूमिगत राहून या आंदोलनाला दिशा देण्याचा प्रयत्न केला. उषा मेहतांनी आपल्या काही सहकाऱ्यांसोबत भूमिगत राहून 'काँगेस रेडिओ'चे प्रसारण केलं. 

लोकांनी ब्रिटिश शासनाच्या प्रतिकांविरोधात निदर्शनं करायला सुरुवात केली. भारत छोडो आंदोलनाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या आंदोलनात महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला होता. अरुणा असफ अली यांनी 9 ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्ताने मुंबईतील गवालिया टॅंकच्या मैदानात तिरंगा फडकावला. तेव्हापासून या मैदानाला ऑगस्ट क्रांती मैदान या नावानं ओळखलं जातं. 

काही प्रमाणात हिंसा आणि प्रतिसरकारची स्थापना
हे आंदोनल अहिंसक पद्धतीने करायचं असं ठरलं असताना नेत्यांच्या अटकेमुळे आंदोलनाला काही प्रमाणात हिंसक वळण लागलं. त्यामुळे ठिकाणी रेल्वे पटऱ्या उखडण्यात आल्या, रेल्वे स्टेशन आणि पोलीस स्टेशनला आग लावण्यात आली, तारायंत्रे उखाडण्यात आली. मुंबई, अहमदाबाद आणि जमशेदपूर या ठिकाणी कामगारांनी आंदोलनात भाग घेतला. सरकारी इमारतींवर तिरंगा फडकवण्यात आला.

साताऱ्यात क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रतिसरकारची स्थापना करण्यात आली. बलिया, बस्ती, मिदनापूर आणि इतरही काही भागात अशा प्रकारची प्रतिसरकारे स्थापन करण्यात आली.  या आंदोलनाने भारताच्या भावी राजकारणाचा पाया रचला. गांधींजीनी आपल्या भाषणात सांगितलं होतं की, ज्यावेळीही सत्ता मिळेल त्यावेळी ती भारतीयांनाच मिळेल. सत्ता कोणाकडे सोपवायची याचा निर्णयही भारतीयच घेतील. 

ब्रिटिशांनी भारत छोडा आंदोलन दाबण्याचा प्रयत्न केला होता पण त्यांनी सत्तेत राहण्याची नैतिकता गमावली होती. ब्रिटिशांच्या सत्तेचा पाया असलेल्या पोलीस आणि लष्करी व्यवस्थेवरील त्यांचे नियंत्रण संपलं होतं. त्यामुळे आता ब्रिटिश भारतावर जास्त काळ सत्ता गाजवू शकणार नाहीत हे स्पष्ट झालं होतं. 

भारत छोडो आंदोलनाचा इतिहास अज्ञात योध्यांच्या बलिदानाने भारुन गेला आहे. त्या काळातील कामगार, शेतकरी, विद्यार्थी, पत्रकार, कलाकार यांच्या अनेक साहसी गोष्टी आहेत. भारत छोडो हे केवळ ब्रिटिशांविरोधात आंदोलन नव्हतं तर ते भारतीय लोकांमध्ये एक नवीन चेतनाचा संचार होता. त्यामुळे ब्रिटिशांना भारत सोडावा लागला.

जगभरात बदलाचे वारे

भारत छोडो आंदोलन अशा वेळी सुरु करण्यात आलं होतं ज्यावेळी जग एका जबरदस्त बदलातून जात होतं. जग दुसऱ्या महायुद्धाच्या खाईत लोटलं गेलं होतं तर जगातल्या अनेक देशांमध्ये साम्राज्यवादाविरोधात शेवटची लढाई सुरु होती. भारतामध्ये एका बाजूला भारत छोडो आंदोलन सुरु होतं तर दुसऱ्या बाजूला नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वाखाली आझाद हिंद सेनेनं ब्रिटिशाविरोधात लढा पुकारला होता. 

भारत छोडो आंदोलनामुळे ब्रिटिशांच्या सत्तेला शेवटचे हादरे बसायला सुरुवात झाले. ही लढाई अंतिम असेल आणि यानंतर केवळ स्वातंत्र्य आणि स्वातंत्र्यच मिळेल असा आत्मविश्वास प्रत्येक भारतीयांच्या मनात निर्माण झाला. तसेच ब्रिटिशांनाही आता आपली सत्ता सोडावी लागणार याची खात्री झाली. भारतीय स्वातंत्र्यासाठी अनेक क्रांतीकारकांनी, स्वातंत्र्य सैनिकांनी आणि अज्ञात वीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. भारताच्या भावी पिढ्यांनी स्वातंत्र्याचा श्वास घ्यावा यासाठी अनेकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. 

या ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्ताने त्या सर्व वीरांना सलाम..!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या