लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
कर्जत : कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून विजयी झाल्यानंतर राष्ट्रवादी
काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी
भाजपला धक्के देणे सुरूच ठेवले आहे. भाजपच्या ताब्यातील नगरपंचायत जिंकण्यासाठी
हालचाली सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून भाजपसह अन्य पक्षातील कार्यकर्त्यांना
राष्ट्रवादीत आणण्याचे डावपेच सुरू आहेत. सोमवारी कर्जतमधील नगरसेवकांसह भाजपच्या
काही पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. एकेकाळी हे कार्यकर्त
माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांचे समर्थक होते.
विशेष म्हणजे भाजपचे
प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील रविवारी कर्जत तालुक्यात खासगी दौऱ्यावर आले होते.
त्यांची पाठ फिरताच कर्जत नगरपंचायतचे भाजपचे नगरसेवक नितीन तोरडमल, लालासाहेब शेळके, भाजपचे जिल्हा संघटन सचिव पदाचा
राजीनामा दिलेले प्रसाद ढोकरीकर तसेच देविदास खरात यांनी राष्ट्रवादी
काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पुण्यात हडपसर येथे आमदार रोहित पवार यांच्या उपस्थित
हा कार्यक्रम झाला. पवार यांनी या सर्वांचे पाक्षात स्वागत केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष
सुनील शेलार, युवक शहराध्यक्ष विशाल मेहत्रे, विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष स्वप्निल तनपुरे, संतोष
नलावडे उपस्थित होते.
शेलार यांनी सांगितले, ‘भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेले सर्वजण कुठलीही
अट न ठेवता आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन आले आहेत. शहरात रोज
विकास कामे सुरू होत आहेत. यामुळे या विकासामध्ये सहभागी होण्यासाठी या सर्वांनी
भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे,’ असेही
शेलार यांनी सांगितले.
0 टिप्पण्या