Ticker

6/Breaking/ticker-posts

आरक्षणावर फडणवीसांची नवी भूमिका; म्हणाले, 'तो संघर्ष टाळण्यासाठी...'

 *वंचितांतील वंचितांना आरक्षण मिळाले पाहिजे!

*ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर भाजप ठाम.









लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 पुणे: अनुसूचित जातींमध्ये आहे रेआणि नाही रेवर्ग तयार करायचा नसेल तर वंचितांमधील अतिवंचितांना  आरक्षण देण्याची व्यवस्था उभी करावी लागेल. त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती आहे का, हे सांगता येणार नाही,’ असे मत विधानसभेतील विरोधी पक्षनेते व रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे अध्यक्ष देवेंद्र फड्णवीस यांनी व्यक्त केले. मूठभर मंडळी विचारांचे ब्रँडिंगकरत असून, असे विचारांचे ट्रोलिंगबंद करावे लागेल,’ असेही त्यांनी नमूद केले.

ओबीसींच्या राजकीय आरक्षण परत येत नाही, तोवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ नयेत, ही भाजपाची ठाम भूमिका आहे, असा पुनरूच्चारही फडणवीस यांनी यावेळी केला. पद्मश्री पुरस्काराने सन्मानित मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे सय्यदभाई, सामाजिक कार्यकर्ते डॉ. गिरीश प्रभुणे, साहित्यिक नामदेव कांबळे, हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार आणि सरस्वती सन्मान प्राप्त ज्येष्ठ साहित्यिक डॉ. शरणकुमार लिंबाळे यांचा रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीतर्फे सत्कार करण्यात आला. या वेळी ते बोलत होते. प्रबोधिनीचे उपाध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे, ज्येष्ठ लेखक रमेश पतंगे, प्रबोधिनीचे महासंचालक रवींद्र साठे या वेळी उपस्थित होते.

सत्काराला उत्तर देताना नामदेव कांबळे यांनी केंद्र व राज्य सरकारने अनुसूचित जातींना चार संवर्गात विभागून, तळागाळातील जातींपर्यंत आरक्षणाचे लाभ पोहोचविण्याची अपेक्षा व्यक्त केली. त्यावर बोलताना फडणवीस म्हणाले, ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षणाची भूमिका मांडताना पन्नास वर्षांसाठी आरक्षण ठेवले होते. त्यानंतर दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यात वाढ केली. परंतु, अनुसूचित जातींमधील मोठा समाजघटक अजूनही आरक्षणापासून दूर आहे. त्यामुळे अजून खूप काळ आरक्षण योग्य प्रकारे राबवावे लागणार आहे. अन्यथा आरक्षित समाजातही दोन वर्गांमध्ये संघर्ष होईल. तो टाळण्यासाठी वंचितांमधील वंचितांना आरक्षण देण्याची व्यवस्था उभारावी लागेल.तत्पूर्वी, ‘उपेक्षितांचे अंतरंग जाणणाऱ्या व मांडणाऱ्या या सत्कारमूर्तींनी महाराष्ट्राचे सांस्कृतिक जीवन समृद्ध केले आहे. त्यांचे कार्य आगामी पिढ्यांसाठी पथदर्शी ठरेल,’ असा गौरव डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी केला. प्रबोधिनीच्या कार्यकारी प्रमुख स्वाती महाळंक यांनी सूत्रसंचालन केले.

सरस्वती सन्मानानंतर शिव्या, निषेधाच्या प्रतिक्रिया!

सनातनकादंबरीसाठी के. के. बिर्ला फाउंडेशनकडून सरस्वती सन्मानपुरस्कार जाहीर झाल्यानंतर शिव्या, बीभत्स भाषणे व निषेधाच्या प्रतिक्रिया येत आहेत. त्यामुळे मला ओक्साबोक्शी रडावेसे वाटत होते, अशी खंत डॉ. शरणकुमार लिंबाळे यांनी व्यक्त केली. वीस वर्षानंतर मायमराठीला हा सर्वोच्च पुरस्कार मिळाला असताना, शासनाने साधे अभिनंदनही केले नाही, एकही मराठी, पुरोगामी लेखक बोललेला नाही, दलित लेखक मूक आहेत. दुसरीकडे मराठीला अभिजात दर्जा मिळाला पाहिजे, असा ढोंगीपणा केला जात आहे. हा संवेदनाशून्यपणा व रानटीपणा आहे,’ अशी व्यथाही त्यांनी मांडली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या