लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
महाड (रायगड): मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी अटक करण्यात
आल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना
रात्री उशिरा महाड येथील कोर्टात हजर करण्यात आले असता कोर्टाने त्यांना जामीन
मंजूर केला आहे. त्यामुळे दुपारी रत्नागिरीतील संगमेश्वर येथे सुरू झालेले अटकनाट्य रात्री रायगड जिल्ह्यात जाऊन थांबले आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा सुरू असतानाच आज दुपारी त्यांना अटक करण्यात आली. संगमेश्वरमधील
गोळवली येथे ही कारवाई करण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल
आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात ही कारवाई पोलिसांनी केली.
रत्नागिरीच्या पोलीस उपअधीक्षकांच्या हजेरीत ही कारवाई झाली. यावेळी पोलिसांचा मोठा
फौजफाटा होता. अटकेवेळी पोलिसांना राणे समर्थकांनी तीव्र विरोध केला होता.
अटकेनंतर राणे यांना सुमारे दोन तास संगमेश्वर पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले होते.
तिथून मग त्यांना रायगडमधील महाड येथील कोर्टात हजर करण्याचे ठरवण्यात आले. राणे
यांनी महाडमध्येच मुख्यमंत्री ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले होते.
संगमेश्वर ते महाड हे अंतर तीन ते साडेतीन तासांचे
असून रात्री उशिरा राणे यांना घेऊन पोलीस महाडमध्ये दाखल झाले. तिथे महाड पोलीस
ठाण्यात दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने प्रक्रिया पार पाडून त्यानंतर राणे यांना
कोर्टात हजर करण्यात आले. अॅड. अनिकेत निकम यांच्याकडून राणे यांच्यावतीने
युक्तिवाद करण्यात आला. अनिकेत हे उज्ज्वल निकम यांचे पुत्र आहेत. राणे यांना
जामीन देण्यात यावा, अशी
विनंती वकिलांकडून करण्यात आली. राणे यांच्या तब्येतीचं कारणही यावेळी देण्यात
आलं. तर पोलिसांकडून ७ दिवसांच्या कोठडीची मागणी करण्यात आली. राणे यांना जामीन
दिल्यास पुन्हा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा युक्तिवाद सरकारी वकिलांकडून करण्यात आला. राणे यांनी
मुख्यमंत्र्यांची बदनामी करण्यासाठी जाणीवपूर्वक आक्षेपार्ह विधान केले. त्यामागे
कटाचा भाग असू शकतो. त्याचा तपास करायचा असल्याने त्यांना कोठडी देण्यात यावी,
अशी विनंतीही करण्यात आली. कोर्टाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद
ऐकून राणे यांना न्यायालयीन कोठडी दिली. त्यानंतर लगेचच राणे यांच्याकडून जामीन
अर्ज करण्यात आला असता कोर्टाने जामीन मंजूर केला.
0 टिप्पण्या