*तलाठी असल्याचं सांगत
वृद्ध महिलेची केली फसवणूक
*गळ्यातील सोन्याची पोत आणि
दोन हजार रुपये बळजबरीने घेतले काढून
*पोलिसांच्या तत्परतेमुळे आरोपीला तात्काळ अटक
लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
याप्रकरणी पोलिसांनी तातडीने शोध घेतल्याने काही
तासांतच आरोपीला जेरबंद करण्यात यश आलं आहे. ज्ञानदेव हरीभाऊ चेडे (वय ३७, मूळ रा. पुणेवाडी, ता. पारनेर, हल्ली रा. हनुमाननगर, अरणगाव रोड, नगर) असं त्याचं नाव आहे.
अहमदनगर शहरातील माळीवाडा एसटी बस स्थानकात ही घटना
घडली. शांताबाई मोरे (वय ६५, रा. वाळूंज ता. नगर) या नगर शहरातील माळीवाडा बसस्थानकात आल्या होत्या.
तेथे त्या बसची प्रतीक्षा करीत होत्या. त्यावेळी आरोपी चेडे तेथे आला. त्याने
त्यांना ओळखत असल्याचे सांगून आपण तुमच्या वाळूंज गावचे तलाठी असल्याचे सांगितले.
तुमच्या पीक विम्याचे ७० हजार रुपये आले आहेत. ते बँकेत आहेत. ते तुम्हाला द्यायचे
आहेत, असे सांगून तो शांताबाई यांना सोबत येण्यास सांगत
होता. शांताबाईंचा त्याच्यावर विश्वास बसत नव्हता. तरीही त्याने बोलण्यात गुंतवत,
पैसे मिळणार असल्याचे सांगत त्यांना रिक्षात बसवून घेऊन गेला.
रिक्षा शहरातील स्वस्तिक चौकातील पुणे बसस्थानकाच्या मागील बाजूला नेली. हा रस्ता
कमी वर्दळीचा असतो. तेथे गेल्यावर चेडे याने शांताबाई यांच्या गळ्यातील सोन्याची
पोत, त्यांच्याकडील दोन हजार रुपये बळजबरीने काढून घेतले आणि
तेथून पोबारा केला.
आपली
फसवणूक झाल्याचे शांताबाई यांच्या लक्षात आले. त्यांनी नागरिकांच्या मदतीने
कोतवाली पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी
तातडीने शोध मोहीम सुरू केली. शांताबाई यांच्याकडून आरोपीबद्दल शक्य तेवढी माहिती
संकलित करून पोलिस पथक कामाला लागले. काही वेळातच आरोपी चेडे माळीवाडा भागात आढळून
आला. पोलिसांनी त्याला पकडले. त्याच्याकडून सोन्याची पोत आणि दोन हजार रुपयेही
हस्तगत करण्यात आले. आरोपी ज्ञानदेव चेडे हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरूद्ध
पारनेर तालुक्यात आणि पुणे जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांतही वेगवेगळे गुन्हे
दाखल आहेत.
ज्येष्ठ नागरिकांना लुटण्यासाठी अनेकदा पोलिस, तर कधी सीआयडी असल्याची बतावणी केली
जाते. पुढे दंगल सुरू आहे, खून झाला आहे, नाकेबंदी आहे. तुमच्याकडील दागिने सुरक्षित ठेवा, असे
सांगत मदतीच्या बहाण्याने दागिने पळवून नेण्याचे प्रकार घडतात. यातील आरोपी पकडले
जाण्याचे प्रमाणही कमी असते. नगर जिल्ह्यात श्रीरामपूर येथील धिप्पाड शरीरयष्ठी
असलेल्या काही जणांच्या टोळ्या अशा गुन्ह्यात सक्रीय असल्याचे यापूर्वी आढळून आले
आहे. मात्र, आता तलाठी असल्याची आणि पीक विम्याची बतावणी
करून लुटण्याचा वेगळाच प्रकार नगरमध्ये पाहायला मिळाला. विशेष म्हणजे ज्येष्ठ
महिलेने तातडीने दिलेली माहिती आणि पोलिसांची तत्परता यामुळे आरोपी पकडला गेला आहे.
0 टिप्पण्या