Ticker

6/Breaking/ticker-posts

मनपाचा माफीनामा 'ती' नोटीस अखेर मागे; तालिबानी राजवट म्हणत झाली होती सड्कुन टीका

 








लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

नगर: लसीकरणातील गोंधळासंबंधी प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराला देण्यात आलेली नोटीस अहमदनगर महापालिकेने अखेर मागे घेतली. मनपाच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी संबंधित पत्रकाराला माफीनामा पाठविला असून नोटीस मागे घेतली असल्याचे कळविले आहे. दरम्यान, या नोटीसवरून राज्यभरातील पत्रकार संघटना आणि विविध राजकीय पक्षांनी आवाज उठविला होता. नगरमधील पत्रकारांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली होती. त्यानंतर महापालिका आयुक्त शंकर गोरे यांनीही दिलगिरी व्यक्त करत या प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन दिले.

पत्रकार परिषदेत एका वार्ताहराने ग्रामविकास मंत्री व अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री यांना प्रश्न विचारून शहरातील लसीकरणात होत असलेल्या गोंधळाकडे लक्ष वेधले होते. मुश्रीफ यांनी यात लक्ष घालून चौकशी करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या होत्या. मात्र, महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारालाच नोटीस पाठवून तीन दिवसांत तक्रारीसंबंधी खुलासा आणि पुरावे द्यावेत, असे बजावले. याचे तीव्र पडसाद राज्यात उमटले. शिवसेना, भाजप या राजकीय पक्षांनी तर राज्यस्तरीय आणि राज्यातील अनेक पत्रकार संघटनांनी याचा निषेध करून संबंधितांना धारेवर धरले.

 ही नोटीस मागे घ्यावी, अन्यथा यापुढे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना अहमदनगरमध्ये पत्रकार परिषद घेऊ देणार नाही, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिला. ठाकरे सरकारने पालिका प्रशासनाच्या खांद्यावर बंदूक ठेवून पत्रकारांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करू नये, असे मनसे जिल्हा सचिव नितीन भुतारे यांनी म्हटले. भुतारे यांनी मनसेतर्फे याचा निषेध केला. पत्रकारांचा आवाज दाबण्याचा हा प्रकार तालिबानी वृत्तीचा आहे. लसीकरणाच्या घोटाळ्याला एक प्रकारे खतपाणी घातले जात आहे. प्रश्न विचारणाऱ्यांना धमकविण्याचे प्रकार सुरू असल्याचे त्यांनी म्हटले.

महाराष्ट्रात तालिबानी राजवट आहे का?, असा सवाल करत भाजप प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी या प्रकारावर संताप व्यक्त केला. भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रा. भानुदास बेरड यांनीही या प्रकाराचा निषेध केला. महापालिकेने नोटीस देऊन पत्रकारांचा आवाज बंद करण्यापेक्षा ते तक्रार करीत असलेला गैरप्रकार शोधून कारवाई करावी, अशी मागणी बेरड यांनी केली. या प्रकाराकडे त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचेही लक्ष वेधले. त्यामुळे राज्यपातळीवरून भाजपने याची दखल घेतली आहे. नगरमधील पत्रकारांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन या प्रकाराचा निषेध नोंदवून नोटीस मागे घेण्याची मागणी केली. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी आयुक्त शंकर गोरे आणि आरोग्य अधिकाऱ्यांशी चर्चा केली. ही नोटीस चुकीच्या पद्धतीने पाठविण्यात आल्याचे महापालिकेने मान्य केले असून ती मागे घेत माफीनामाही सादर केला.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या