Ticker

6/Breaking/ticker-posts

ठाकरे सरकारचा नारायण राणेंना दणका; मुंबईत जन आशीर्वाद यात्रेवर मोठी कारवाई

 






लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

मुंबई: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेने आज मुंबईतील वातावरण ढवळून निघालं. भाजपची ही यात्रा अनेक कारणांनी आधीपासूनच चर्चेत असताना यात्रेला ठाकरे सरकारने दणका दिला आहे. यात्रेवर कारवाईचं मोठं पाऊल उचलण्यात आलं आहे. कोविड काळात काढण्यात आलेल्या या यात्रेविरुद्ध मुंबईतील विविध पोलीस ठाण्यांत सात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

राज्यात करोना संसर्गाची दुसरी लाट नियंत्रणात आली असली तरी तिसऱ्या लाटेचा धोका कायम असल्याने कोविड विषयक नियमांचे पालन अजूनही बंधनकारक आहे. त्याच पार्श्वभूमीवर नारायण राणे जन आशीर्वाद यात्रा कारवाईच्या कचाट्यात सापडली आहे. करोना काळात राजकीय सभा आणि रॅली बंदी असताना जन आशीर्वाद यात्रा काढून नियमभंग केल्याप्रकरणी मुंबईतील विलेपार्ले, खेरवाडी, माहीम, शिवाजी पार्क, दादर, चेंबूर, गोवंडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सरकारी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी कलम १८८ अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार केंद्रातील भाजपचे सर्व नवे मंत्री जन आशीर्वाद यात्रा काढून नागरिकांशी संवाद साधत आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेला आज मुंबईतून सुरुवात झाली. आधीपासूनच अनेक कारणांनी चर्चेत असलेल्या या यात्रेवरून आजही बरंच वादळ उठलं. जन आशीर्वाद यात्रेची सुरुवात मुंबई विमानतळ येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर राणे यांनी चैत्यभूमीवर जाऊन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. तिथून नारायण राणे शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी दाखल झाले व तिथे नतमस्तक झाले. 

शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी राणे यांना उघडपणे इशारा देत स्मृतीस्थळी जाण्यास विरोध केल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. राणे यांच्यासह त्यांचे पुत्र निलेश राणे आणि नितेश राणे यांनीही बाळासाहेबांच्या स्मृतींना वंदन केले. त्यानंतर राणे यांची जन आशीर्वाद यात्रा पुढे सरकली. मुंबईतील विविध भागात राणे आज पोहचले. यादरम्यान त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही लक्ष्य केले. या यात्रेला होत असलेली गर्दीच भाजपच्या अडचणी वाढवणारी ठरली असून पोलिसांनी ठिकठिकाणी सात गुन्हे दाखल केले आहेत. हे गुन्हे दाखल झाल्यानंतर त्यावर राणे यांच्याकडून अजून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या