Ticker

6/Breaking/ticker-posts

मुंबईत बॉम्बची दहशत पसरवणाऱ्या कॉलचं आषाढ पार्टी कनेक्शन !; नेमकं काय घडलं काल रात्री?

 

*मुंबईत चार ठिकाणी बॉम्ब ठेवल्याचा कॉल करणारे सापडले.

*शिळफाटा येथून पोलिसांनी दोन जणांना ठोकल्या बेड्या.

*गटारीची पार्टी सुरू असताना दारूच्या नशेत केला कॉल.








लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

मुंबई: मुंबई पोलिसांच्या १०० नंबरवर शुक्रवारी रात्री ८ वाजून ५३ मिनिटांनी आलेल्या एका फोनने पोलिसांची झोप उडवली होती. मॅरेथॉन सर्च ऑपरेशननंतर या माहितीत काहीही तथ्य नसल्याचे आढळून आले होते. दरम्यान, मोबाइल लोकेशनच्या आधारे पोलीस आरोपींपर्यंत पोहचले असून शिळफाटा येथून तीन जणांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. राकेश कांगणे, गणेश शेळके आणि रमेश शिरसाट अशी या तिघांची नावे असून गटारी साजरी करत असताना दारूच्या नशेत त्यांनी हा धमकीचा कॉल केला होता, अशी धक्कादायक बाब समोर आली आहे.

मुंबई :मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस भायखळा रेल्वे स्टेशनदादार रेल्वे स्टेशन आणि महानायक अमिताभ बच्चन यांचा बंगला अशा चार ठिकाणी बॉम्ब प्लांट करण्यात आले आहेत, असा कॉल मुंबई पोलिसांना आल्याने एकच खळबळ उडाली होती. शुक्रवारी रात्री ८.५३ वाजता आलेल्या या कॉलने पोलिसांची झोप उडवण्याचे काम केले. फोनवरून सांगण्यात आलेल्या चारही ठिकाणी सर्च ऑपरेशन तातडीने सुरू करण्यात आले. रेल्वे पोलीस, रेल्वे सुरक्षा बल तसेच बाँब शोधक आणि नाशक पथक, श्वान पथक यासह शोध घेण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालय, वाहनतळ, सर्व फलाट आणि आजूबाजूचा परिसरही तपासण्यात आला. या सर्च ऑपरेशनमध्ये एटीएस टीम, शीघ्र कृती दल तसेच स्थानिक पोलिसांनाही पाचारण करण्यात आले. मात्र संशयास्पद अशी कोणतीही वस्तू चारही ठिकाणी आढळून आली नाही. त्यानंतर हा अफवा आणि दहशत पसरवणारा कॉल होता, या निष्कर्षापर्यंत पोलीस पोहचले. मग पोलिसांनी कॉलरचा शोध सुरू केला.

मला डिस्टर्ब करू नका म्हणत...

बॉम्ब प्लांट केल्याचा निनावी फोन आल्यानंतर पोलिसांनी लगेचच त्या क्रमांकावर संपर्क साधला होता. तेव्हा माझ्याकडे होती ती माहिती मी तुम्हाला दिली. आता मला डिस्टर्ब करू नका, असे सांगून समोरच्या व्यक्तीने फोन ठेवून दिला होता. त्यानंतर हा फोन स्विच ऑफ लागत होता. दरम्यान, मोबाइल लोकेशनच्या आधारे पोलिसांनी संबंधिताला हुडकण्यात यश मिळवले. ठाण्यातील शिळफाटा येथून राकेश कांगणे, गणेश शेळके आणि रमेश शिरसाट या तिघांना पोलिसांनी अटक केली. यातील एकजण ट्रक ड्रायव्हर आहे. शिळफाटा येथे हे तिघेही गटारी पार्टी साजरी करत होते. तिथूनच त्यांनी दारूच्या नशेत मुंबई पोलिसांना फोन केल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंबई पोलीस किती सतर्क आहेत हे पाहण्यासाठी आम्ही हा कॉल केला होता, असा दावाही या तिघांनी पोलीस तपासादरम्यान केला आहे. हे तिघेही डोंबिवलीत राहणारे आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या