Ticker

6/Breaking/ticker-posts

पंजशीरवर हल्ला करणाऱ्या तालिबानला जबर झटका ; ३०० तालिबानी ठार ?









 लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

काबूल: अफगाणिस्तानवर ताबा मिळवलेल्या तालिबानला पंजशीर प्रांतावर ताबा मिळवता आला नाही. पंजशीर प्रांतावर ताबा मिळवण्यासाठी तालिबानने मोहीम आखली आहे. तालिबानने आपले बंडखोर पंजशीरवर हल्ला करण्यास पाठवले आहे. मात्र, पंजशीरमधील तालिबानविरोधकांनी त्यांना मोठा झटका दिला आहे. पंजशीरमधील एका सापळ्यात तालिबानी अडकले. जवळपास ३०० तालिबानी ठार  झाल्याचे वृत्त आहे. तर, तालिबानने हे वृत्त फेटाळून लावले आहे.

वृत्तसंस्थांनी दिलेल्या वृत्तानुसार, तालिबानने कारी फसीहुद दीन हाफिजुल्लाहच्या नेतृत्वात पंजशीरवर हल्ला करण्यासाठी शेकडो तालिबानींना पाठवले होते. मात्र, बागलान जवळील अंदराब खोऱ्यात सापळा लावून बसलेल्या पंजशीरच्या फौजांनी त्यांच्यावर हल्ला केला. यामध्ये ३०० तालिबानी ठार झाल्याचे समोर आले. त्याशिवाय तालिबानींची रसदही तुटली असल्याचे समोर आले आहे.

पंजशीरमधील तालिबानविरोधी फौजांनी ३०० तालिबानींना ठार केले असून अनेकांना बंदी केले असल्याचा दावा केला. बागलान प्रांतातही अनेक तालिबानींना कैद करण्यात आली आहे. बीबीसीच्या पत्रकार यालदा हकीम यांनी काही तालिबानींचा फोटो ट्विट केला आहे. तालिबानी विरोधी गटांनी अंदराबमधील युद्धात काही तालिबानींना पकडण्यात आले असल्याची माहिती दिली असल्याचे हकीम यांनी सांगितले.

सालेह यांचा तालिबानला इशारा

स्वत: ला अफगाणिस्तानचा कार्यवाहक राष्ट्रपती घोषित करणाऱ्या अमरुल्लाह सालेह यांनी ट्विट केले आहे. अंदराब खोऱ्यात अडकल्यानंतर मोठ्या प्रयत्नानंतर तालिबानी त्यातून बाहेर पडले. त्यानंतर आता एक दिवसानंतर तालिबानने पंजशीरच्या मुख्य मार्गावर आपल्या फौजा तैनात केल्या आहेत. या दरम्यान, सलांग महामार्गदेखील विद्रोही गटांनी बंद केल्याची माहिती सालेह यांनी दिली.

दहा हजार जवान करणार तालिबानशी दोन हात

पंजशीरमधील विद्रोही गटांचे नेतृत्व करणारे अहमद मसूद यांनी शरणागती पत्करणार नसल्याचे म्हटले. आम्ही तालिबानसोबत युद्ध करण्यास तयार आहोत. आमचे १० हजारांहून अधिक लोक तालिबानशी दोन हात करण्यास तयार आहेत. तालिबानने आमच्यासोबत संघर्ष न केल्यास बरे होईल, असा इशाराही त्यांनी दिला. मसूद यांनी वडिलांच्या मार्गावर चालणार असून तालिबानसमोर झुकणार नसल्याचे स्पष्ट केले. मसूद यांचे वडील अहमद शाह मसूद यांनी तालिबानविरोधी नॉदर्न अलायन्सचे नेतृत्व केले होते. सन १९९६ च्या सुमारास अफगाणिस्तानमध्ये तालिबानी राजवट आली होती. त्यानंतर वर्ष २००१ पर्यंत पंजशीर प्रांतावर तालिबानला ताबा मिळवता आला नव्हता.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या