Ticker

6/Breaking/ticker-posts

प्रेरणादायी : झेडपी शाळेचा विद्यार्थी बनला चक्क न्यायाधीश..!









 लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 औरंगाबाद : गंगापूर भागातील गळनिंब या गावातील जिल्हा परिषदेचे माजी विद्यार्थी नीलेश दहातोंडे पाटील यांची धुळे येथे जिल्हा न्यायाधीश म्हणजेच दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर तथा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी म्हणुन नियुक्ती करण्यात आली आहे. गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकून नीलेश दहातोंडे पाटील यांनी यशाचा नवीन शिखर गाठला आहे.

 गंगापूर तालुक्यातील गळनिंब गावचे भूमीपुत्र नीलेश दहातोंडे पाटील यांचे वडील जायकवाडी पाटबंधारे विभागात तीर्थपुरी येथे नोकरीस होते. त्यांचे शालेय प्राथमिक शिक्षण तीर्थपुरी (ता. घनसावंगी, जि. जालना) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत, तर माध्यमिक शिक्षण मत्स्योदरी विद्यालयात झाले. त्यांनी मुक्तानंद महाविद्यालय गंगापूर येथून पदवीचे शिक्षण घेतल्यानंतर एलएलबी आणि एलएलएम हे कायदेविषयक शिक्षण औरंगाबादच्या माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालयातून पूर्ण केले आहे.

शिक्षण झाल्यानंतर गंगापूर येथील दिवाणी न्यायालयात २०१२ ते २०१९ अशी सात वर्षे दिवाणी व फौजदारी प्रकरणी वकिली केली. २०१९मध्ये घेण्यात आलेल्या दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर तथा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पदांच्या परीक्षेमध्ये ११६व्या रँकमध्ये ते उत्तीर्ण झाले होते. नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या त्यांची जिल्हा न्यायालय,धुळे येथे नुकतीच ३१ जुलै रोजी दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर तथा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी,म्हणुन नियुक्ती झाली आहे. त्यांनी त्याच दिवशी आपल्या कामालाही प्रारंभही केला आहे.

न्यायाधीश पदी गळनिंब पंचक्रोशीत नीलेश यांच्या रूपाने प्रथमच निवड झालेली असल्याने उत्साहवर्धक आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे.

गावात होणार सत्कार

करोनाच्या प्रादुर्भावाचे सावट दूर झाल्यानंतर गळनिंब ग्रामस्थांच्या वतीने नीलेश दहातोंडे पाटील यांच्या भव्य सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार असल्याचे गळनिंबचे शिक्षक राजेश हिवाळे, बलराम नवथर, अप्पासाहेब पाचपुते, नानासाहेब दहातोंडे, डॉ. भगवान सटाले, कल्याण गायकवाड, राहुल सटाले, तुकाराम सटाले, कानिफनाथ उगले, भागीनाथ गोरे आदी ग्रामस्थांनी सांगितले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या