Ticker

6/Breaking/ticker-posts

धक्कादायक बातमी: नाशिक डेल्टाच्या विळ्ख्यात, सापड्ले तब्बल ३० रुग्ण ; अॅलर्ट जारी

 







लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 नाशिक: अत्यंत वेगाने पसरणाऱ्या डेल्टा व्हेरिएंटचे तब्बल ३० रुग्ण नाशिक जिल्ह्यात आढळून आले आहेत. यापैकी दोन रुग्ण नाशिक शहरातील असून सिन्नरसह चांदवडनिफाड, नांदगाव, इगतपुरी आणि येवला तालुक्यातील काही जणांनाही डेल्टा व्हेरिएंट या विषाणूची लागण झाल्याचे आढळल्याने आरोग्य यंत्रणांचे धाबे दणाणले आहेत. डेल्टा व्हेरियंटच्या उपद्रवाला रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणांना सतर्कतेचे आणि सज्जतेचे आदेश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिले आहेत.


जिल्ह्यातील करोना बाधित रुग्णांपैकी पाच टक्के रुग्णांचे स्वॅब तपासणीसाठी पुण्यातील एनआयव्हीकडे पाठविले जातात. करोना विषाणूच्या बदलत्या स्वरूपाचा आढावा घेणारी जिनोमिक सिक्वेन्सिंग चाचणी एनआयव्हीमध्ये केली जाते. करोना विषाणूमध्ये झालेला बदल, त्याचा प्रादुर्भाव आणि त्याबाबतची माहिती जिनोमिक सिक्वेन्सिंग चाचण्यांमधून स्पष्ट होते. नाशिकमधून गेल्या १५ दिवसांत पाठविण्यात आलेल्या १५५ स्वॅबपैकी ३० जणांच्या स्वॅबमध्ये डेल्टा व्हेरिएंट आढळून आला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणाही खडबडून जाग्या झाल्या आहेत. संबंधित ३० रुग्णांच्या संपर्कात राहण्याचे व त्यांच्या आरोग्यातील बदलांकडे बारकाईने लक्ष देण्याचे आदेश मांढरे यांनी दिले आहेत.

शहरात डेल्टाचे दोन रुग्ण

नाशिक शहरातील वडाळा परिसरातील सादिकनगरमध्ये, तसेच गंगापूर रोड परिसरात डेल्टा व्हेरिएंटचा एक रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेची जबाबदारी वाढली आहे. याशिवाय सिन्नर तालुक्यातील दोडी, मेंढी, ठाणगाव, मुसळगाव येथेही डेल्टा व्हेरियंटचे रुग्ण आढळले आहेत. निफाड तालुक्यात महाजनपूर, कसबे सुकेणे येथे, येवला तालुक्यात येवला गावासह कासारखेडा येथे डेल्टा व्हेरिएंटचे रुग्ण आढळले आहेत. नांदगाव तालुक्यातील कासारी, मांडवड, चांदवड तालुक्यातील वडाळी भोई, कुंडलगाव, कानमंडाळे, कळवण तालुक्यातील शिवाजीनगर, इगतपुरी तालुक्यातील घोटी या ठिकाणच्या काही बाधित रुग्णांमध्ये डेल्टा व्हेरिएंट आढळला आहे. त्यामुळे या गावांवर आरोग्य यंत्रणेने अधिक लक्ष केंद्रित केले आहे.

जिल्ह्यात डेल्टा व्हेरिएंटचे रुग्ण आढळले असले तरी हा व्हेरिएंट डेल्टा प्लस इतका घातक नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. परिस्थिती हाताळण्यासाठी यंत्रणा सज्ज आहे. नागरिकांनी यापुढे अधिक काळजी घेणे आवश्यक असून, सुरक्षाविषयक नियमावलीचे कसोशीने पालन करणे आवश्यक आहे - सूरज मांढरे, जिल्हाधिकारी

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या