लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
पुणे: येथील शिवाजी रस्त्यावरील मामलेदार कचेरीच्या आवारात असलेल्या जुन्या हवेली पोलीस ठाण्याच्या
मुद्देमाल कक्षात चोरीचा प्रकार समोर आला आहे. चोरट्यांनी पोलीस ठाण्याच्या बंद
असलेल्या मुद्देमाल खोलीच्या छताची कौले काढून गुन्ह्यात जप्त केलेले अॅल्युमिनियमच्या
पट्ट्या, ताब्यांची तार, लोखंडी पत्रे
व इतर असा २७ हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हवेली पोलीस ठाण्याचे कर्मचारी दिलीप गायकवाड यांनी याबाबत तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १३ जून ते १५ जुलै दरम्यान ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे ग्रामीणच्या अंतर्गत असलेले जुने हवेली पोलीस ठाणे शिवाजी रस्त्यावरील मामलेदार कचेरी येथे होते. सध्या हे पोलिस ठाणे सिंहगड रस्त्यावरील अभिरूची मॉलजवळ आहे. मात्र, या पोलीस ठाण्याची मुद्देमाल खोली या ठिकाणी आहे. त्या खोलीत जुन्या काही गुन्ह्यांत जप्त केलेला मुद्देमाल ठेवण्यात आला होता. मुद्देमाल कारकून हे अधून-मधून येऊन पाहणी करून जातात. त्यावेळी काही दिवसांपूर्वी आल्यानंतर त्यांना मुद्देमाल खोलीतील साहित्य चोरीला गेल्याचे दिसले. तसेच, त्या खोलीची कौले देखील काढण्यात आलेली दिसली.
अज्ञात चोरट्यांनी या खोलीच्या छताची कौले काढून आतमधील १५ किलोच्या
अॅल्युमिनियमच्या पट्ट्या, ४५ किलो तांब्याची तार, एक गॅस सिलेंडर, लोखंडी टी टाइप पत्रे ७०, लोखंडी काटेरी तांब्याची तार ४०० फूट, २२५ किलो
शिशाच्या लाद्या, ४०० किलो अॅल्युमिनियमच्या लाद्या असा २७
हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. चोरट्यांनी टेम्पोतून माल पळविल्याचा प्राथमिक
अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हवेली पोलिसांनी सर्व माहिती घेऊन खडक पोलिसांकडे
तक्रार दिली. त्यानुसार सहायक निरीक्षक दादासाहेब सावंत हे अधिक तपास करत आहेत.
मामलेदार कचेरी येथे जुने हवेली पोलीस ठाणे होते. हवेली पोलीस ठाण्याची मुद्देमाल
खोली या ठिकाणी आहे. त्या खोलीत काही गुन्ह्यांत ठेवलेला मुद्देमाल खोलीच्या छताची
कौले काढून नेल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी तपास सुरू आहे, असे खडक पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक नानासाहेब सावंत यांनी सांगितले.
0 टिप्पण्या