*मंत्रालयातील
उपहारगृहाजवळ दारूच्या बाटल्यांचा खच.
*राज्य
सरकारने गंभीर दखल घेत उचलले कठोर पाऊल.
*सामान्य
प्रशासन विभागाने दिले चौकशीचे आदेश.
लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
मुंबई: राज्यातील प्रशासनाच्या दृष्टीने
महत्त्वाची वास्तू असलेल्या मंत्रालयातच आज दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा खच
सापडल्याने मंत्रालयातील एकूणच सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून
दारूच्या बाटल्या मंत्रालयात आल्या कशा, याची चौकशी करण्याचे
आदेश सामान्य
प्रशासन विभागाने दिले आहेत. दरम्यान,
महाराष्ट्राच्या परंपरेला काळिमा फासणारी ही घटना असल्याची टीका
करीत १५ दिवसांत याची चौकशी करण्याची मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.
मंत्रालयाची इमारत सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत
संवेदनशील अशी आहे. राज्याच्या प्रशासनाचा गाडा याच इमारतीतून हाकला जातो. या
इमारतीत जायचे असल्यास सुरक्षेचे सर्व नियम काटेकोरपणे पाळावे लागतात. असे असताना
याच इमारतीत दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा खच आढळल्याने आज एकच खळबळ उडाली. मंत्रालयातील उपहारगृह परिसरात या दारूच्या रिकाम्या बाटल्या आढळून आल्या. त्यामुळे सारेच
चक्रावून गेले आहेत. या बाटल्या इथवर कशा पोहचल्या?, उपहारगृह
परिसरात दारूची पार्टी झाली का?, यामागे नेमकं कोण आहे?,
असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले असून सरकारने या
प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. दारूच्या बाटल्या मंत्रालयात आल्या कशा, याची चौकशी करण्याचे आदेश सामान्य प्रशासन विभागाने तातडीने जारी केले
आहेत.
प्रवीण दरेकर यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
मंत्रालयात दारूच्या बाटल्यांचा खच आढळल्यानंतर
विरोधी पक्ष भाजपने त्यावरून सरकारला जाब विचारला. विधान परिषदेतील विरोधी
पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी याबाबत थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले. या गंभीर प्रकरणाची
अप्पर मुख्य सचिव (गृह) यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून १५ दिवसांच्या आत
उच्चस्तरिय चौकशी करण्याची मागणी दरेकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. राज्याचा
गाडा ज्या मंत्रालयातून हाकला जातो तेथे जर सर्वसामान्यांना प्रवेश करायचा असेल तर
येथील सुरक्षा यंत्रणांचा सामना करावा लागतो. त्यांची चौकशी केली जाते. मात्र
मंत्रालयाची सुरक्षा यंत्रणा भेदून या दारूच्या बाटल्या आत आल्याच कशा, असा सवाल उपस्थित करताना दारूच्या बाटल्या
मंत्रालयामध्ये मिळणे ही दुर्दैवी, चीड आणणारी व
महाराष्ट्रातील परंपरांना काळीमा फासणारी घटना आहे, असे
दरेकर यांनी नमूद केले आहे.
0 टिप्पण्या