लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
अहमदनगर: ‘मी असतो तर मुख्यमंत्र्यांच्या कानशिलात
वाजवली असती’, असे आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पोलिसांनी अटक केली आहे. राणे यांच्या वक्त्यव्याचे
समर्थन करता येणार नाही, मात्र
व्यक्ती म्हणून त्यांच्याशी पाठीशी राहू अशी भूमिका भाजपने घेतली आहे. या
पार्श्वभूमीवर भाजपचे माजी मंत्री प्रा . राम शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या एका विधानाची आठवण करून दिली आहे. त्यासंबंधीचा व्हिडिओ
शेअर करून राणेंना एक न्याय व मुख्यंत्र्यांना दुसरा असे का? असा सवाल उपस्थित केला आहे.
शिंदे यांनी म्हटले आहे, ‘एक ऑगस्ट २०२१ रोजी मुंबई गृहनिर्माण
व क्षेत्रविकास मंडळाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले होते,
"अशी एक झापड देऊ की, पुन्हा कधी
उठणारच नाही." मग जो न्याय केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना तोच न्याय
मुख्यमंत्री ठाकरे यांच्या बाबतीत महाराष्ट्र पोलीस लावणार का? हे राज्य खरच कायद्याचे आहे का? असेल तर पोलीस
प्रशासन समान न्याय करेल काय? हीच अपेक्षा महाराष्ट्रातील
तमाम जनतेची आहे,’ असे शिंदे यांनी म्हटले आहे.
भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी शिवसेना भवन
फोडण्याबाबत विधान केले होते. त्यावर शिवसेनेकडून प्रतिक्रिया उमटल्या होत्या.
भाजप- शिवसेना कार्यकर्ते समोरासमोरही आले होते. शिवसेनेतून संताप व्यक्त होऊ
लागल्यावर प्रसाद लाड यांनी सारवासारव केली होती.
त्याच दरम्यान बीडीडी
चाळीच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी लाड यांचे नाव न घेता स्वत: ठाकरे यांनी
त्यांना हे उत्तर दिले होते. ' आम्हाला कोणी थपडा मारण्याच्या धमक्या देऊ नयेत, नाहीतर अशी एक झापड देऊ की धमक्या देणारे
पुन्हा कधी उठणार नाहीत,' असे ठाकरे म्हणाले होते.
मुख्यमंत्र्यांच्या तोंडी अशी भाषा शोभत नसल्याची टीका त्यावेळीही भाजपच्या
नेत्यांनी केली होती. आता राणे यांना अशाच वक्तव्यासंबंधी अटकेला सामोरे जाण्याची
वेळ आल्याने प्रा. शिंदे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांच्या त्या विधानाची आठवण
करून देत पोलिसांवर टीका केली आहे.
0 टिप्पण्या