लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
मुंबईः 'पंतप्रधान मोदी हेच त्यांच्या मंत्रिमंडळात सबकुछ
आहेत. मंत्री येतात व जातात. मोदी स्वतःला फकीर समजतात व राणे महान हा फरक समजून
घेतला तर राणे हे केंद्रीय मंत्रिमंडळातले थोड्याच दिवसांचे मेहमान आहेत याविषयी
फडणवीसांच्या मनातही शंका नसावी,' असा
घणाघात शिवसेनेनं केला आहे.
नारायण राणे यांनी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत केलेल्या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटले असताना हा
वाद क्षमण्याची चिन्हे दिसत नाहीयेत. भाजप शिवसेना नेत्यांकडून
आरोप- प्रत्यारोपांची मालिका सुरू असतानाच आजच्या सामनाच्या अग्रलेखातून भाजप व
नारायण राणेंवर जोरदार टीका केली आहे.
' राज्यात इकडे तिकडे थोडे काही झाले की, विरोधी
पक्षाची कुंडलिनी जागी होते व राज्यात कायद्याचे राज्य आहे काय, असा प्रश्न त्यांच्याकडून विचारला जातो. यापुढे महाराष्ट्रात विरोधकांकडून
हे असले प्रश्न विचारले जाणार नाहीत. भारतीय जनता पक्षाचे 'पर'आत्मा नारायण राणे यांच्यावर कायद्यानेच कारवाई झाली व माणूस ‘नॉर्मल’ असो वा राणेंसारखा 'अॅबनॉर्मल,'
कायदा सगळ्यांसाठी सारखाच हे राज्याच्या पोलिसांनी दाखवून दिले,'
असा टोला शिवसेनेनं लगावला आहे.
'राणे यांनी मुख्यमंत्र्यांना
मारण्याचे वक्तव्य केले ते आम्हाला मान्य नाही, पण राणेंवरील
कारवाई योग्य नाही,' हे विधान फडणवीस वगैरे लोक करतात ते
कोणत्या आधारावर? अबलेवर एखाद्याने अत्याचार केला, पण त्याच्या मनात तशी काही विकृत भावना नव्हतीच हो, तेव्हा
आरोपीला निर्दोष सोडा व पुढचे गुन्हे करण्यासाठी मोकळीक द्या, अशाच प्रकारचा हा युक्तिवाद आहे. काही काळ वकिली (फौजदारी) करणाऱ्या
फडणवीसांकडून ही अपेक्षा नाही,' असंही शिवसेनेनं म्हटलं आहे.
' भाजपात अतिशहाणपणाचे जे अजीर्ण झाले ते राज्याच्या स्वच्छ वातावरणासाठी
धोकादायक आहे. राज्यातील पर्यावरण कार्यकर्त्यांसाठी हे आव्हान आहे. राणे यांनी
स्वतःला महान समजणे बंद केले तर त्यांच्या आयुष्यातील बऱ्याच समस्या कोणत्याही
औषधांशिवाय बऱ्या होतील व त्यांचा संसर्ग होण्यापासून भाजपाही वाचेल,' अशी खोचक टिप्पणी शिवसेनेनं केली आहे.
' घरात व दारात भरपूर गांजाची शेती
पिकवायची व त्याच गांजाचे सेवन करून कुणावरही कसेही बकायचे हा सध्या अनेक
राजकारण्यांचा धंदा झाला आहे. ही गांजाची शेती कायद्यानेच बंद केली पाहिजे व
त्याची सुरुवात केल्याबद्दल महाराष्ट्राची जनता ठाकरे सरकारला धन्यवाद देत आहे.
फडणवीस व त्यांच्या पक्षाने गांजाच्या शेतात बागडायचे ठरवलेच असेल तर त्यांची नशा
लवकरात लवकर उतरो हीच 'अटल'चरणी
प्रार्थना,' अशी टीका शिवसेनेनं केली आहे.
राणे यांना जेवणाच्या ताटावरून उठवले व अटक केली
असे त्यांचे लोक बोलत आहेत. कायद्याला, पोलिसांना सहकार्य केले असते तर ही वेळ आली नसती.
राणे यांना जेवणावरून उठवणे वाईटच; पण सिंधुदुर्गात श्रीधर
नाईक, रमेश गोवेकर, सत्यविजय भिसे,
अंकुश राणे यांना जेवणावरून, भरसंसारातून
कायमचे कोणी उठवले याचा नव्याने तपास 'ठाकरे; सरकारने करायला हवा.
कायद्याचे राज्य मोडण्याचा प्रयत्न करणे हे
गांजा मारून पडण्याइतके सोपे नाही. हा महाराष्ट्र आहे, तरीही 'वर
आमचे सरकार आहे! महाराष्ट्र केंद्राशी काय संघर्ष करणार?' अशी
मस्तवाल व महाराष्ट्रविरोधी भाषा राणे नावाचे केंद्रीय मंत्री वापरतात.
महाराष्ट्राच्या अस्मितेची इतकी नाचक्की महाराष्ट्राच्या दुष्मनांनीही कधी केली
नव्हती. राणे हे 'नॉर्मल' मनुष्य
नसल्यानेच त्यांनी महाराष्ट्राला कमी लेखले. भाजपाने आता तरी शहाणे व्हावे
0 टिप्पण्या