लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
पारनेर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शिक्षकांच्या कामाबद्दल अपशब्द
वापरल्यासंबंधी एका वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेली बातमी आणि त्यावरून झालेल्या
टिकेवर संताप व्यक्त केला आहे. संबंधित वृत्तपत्राने खोटी बातमी छापल्याने
त्यांच्याविरूद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. शिक्षक आणि समाजानेही अशा
द्वेषभावना पसरविणाऱ्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये, असेही
हजारे यांनी म्हटले आहे.
यासंबंधी
हजारे यांनी एक निवेदन प्रसिद्धीला दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे, ‘नाही तरी शिक्षक शाळेत जाऊन कोणता उजेड
पाडतात: अण्णा हजारे’ या मथळ्याखाली प्रसिद्ध झालेली बातमी
वाचण्यात आली. बातमी वाचून आश्चर्य वाटले. जे विधान मी केलेलेच नाही, ते माझ्या तोंडी घालून समाजात द्वेष भावना निर्माण करण्यासाठी अशी खोटी
बातमी प्रसिद्ध करण्यात आली असे वाटते. अधिक चौकशी करता असे निदर्शनास आले की,
सदर बातमी फक्त एका दैनिकात प्रसिद्ध झाली आहे. यापूर्वीही अनेकदा
त्या वृत्तपत्रातून माझ्याबद्दल आणि जन आंदोलनाबद्दल चुकीच्या व खोट्या बातम्या,
लेख आलेले आहेत. अशीच एक खोटी बातमी छापल्याबद्द्ल आमचे वकिल श्याम
असावा यांनी त्या वृत्तपत्राला २०१९ मध्ये कारवाईसंबंधी कायदेशीर नोटीस बजावली
होती. ही नोटीस मिळाल्यानंतर त्यांनी जाहीर दिलगिरी व्यक्त केली होती. म्हणून
त्यानंतर आम्ही त्याकडे दुर्लक्ष केले व कारवाई करण्याचे टाळले होते.
परंतू
आता पुन्हा त्यांनी अशीच खोटी बातमी छापून शिक्षक, पालक व विद्यार्थी वर्गामध्ये गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला आहे. आमच्या
वकिलांनी त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू केली असून लवकरच
त्यांना संबंधित नोटीस बजावण्यात येईल व कारवाई सुरू करण्यात येईल.
0 टिप्पण्या